पणजी: राज्यात रस्ता अपघात वाढत असताना त्याप्रती असंवेदनशील तसेच बेजबाबदारपणा दाखवणारे वाहतूक खात्याचे संचालक पोलुमतला पी. अभिषेक यांना त्वरित सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी कॉंग्रेस ने केली आहे.
याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मुख्य सचिव पुनीतकुमार गोएल यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी राज्यातील ब्लॅक स्पॉट्स आणि अपघात प्रवण क्षेत्रे सुधारण्यासाठी सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम देतानाच वाहतूक व्यवस्थापन जाग्यावर घालावी अशी मागणीही केली आहे. .
राज्यातील रस्त्यांवरील जीवघेण्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात वाहतूक खात्याचे संचालक अभिषेक यांना अपयश आले आहे. प्रभावी वाहतूक व्यवस्थापनाची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कॉंग्रेसने १९ फेब्रुवारी रोजी वाहतूक खात्यावर माेर्चा नेला होता. यावेळी राज्यात ४८ तासांत पाच मृत्यू होऊनही वाहतूक संचालक रजेवर असल्याचे समोर आले. यावरुन संचालक हे असंवेदनशील असल्याचे स्पष्ट होते.त्यांना वाहतूक संचालक पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे पाटकर यांनी पत्रात नमूद केले आहे.