लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपने नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचे फळ दिले आहे. तानावडे यांना खासदारकीच्या रुपाने निःस्वार्थपणे पक्षासाठी काम केल्याचे फळ मिळाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
ताळगाव येथील कॉम्युनिटी सेंटर येथे भाजपतर्फे तानावडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास मंत्री रवी नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री सुभाष शिरोडकर, माजी आमदार दामू नाईक, आमदार डिलायला लोबो, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दिगंबर कामत, आमदार संकल्प आमोणकर, आमदार प्रवीण आर्लेकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मला आठवते २०१२ च्या निवडणुकीत सदानंद तानावडे यांना आमदारकीचे तिकीट देण्यात आले नव्हते, तेव्हा ते खुप चिडले होते. मी त्यावेळी भाजप कार्यालयात जात होतो, तर ते नाराज होऊन खाली उतरत होते. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी सर्व विसरुन तानावडे पेडणेत आमदाराच्या प्रचारात दाखल झाले. त्यांना नंतर पक्षाचे सरचिटणीसपद देण्यात आले. २०१९ मध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. नंतर २०२२ मध्ये त्यांनी तिकीटसाठी दावा केला असता, परंतु त्यांनी निळकंठ यांना पाठींबा देण्याचे ठरविले, ते जिंकूनही आणले. या सर्व घडामोडीत त्यांनी आपला स्वार्थ बाजुला ठेऊन पक्षाला मोठे केले, हे शिकण्यासारखे आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
माझे यश हे कार्यकर्त्यांचे यश : तानावडे
मी आज खासदार झालो हे फक्त कार्यकर्त्यांमुळे. कार्यकर्त्यांमुळेच मी घडलो आणि या स्तरापर्यंत पोहचलो, याचे श्रेय मी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि कुटुंबियांना देतो. पक्षाने देखील माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवला आहे. माझ्या कारकीदीत पक्षश्रेष्ठींनी मला अनेक पदे विश्वासाने बहाल केले, आणि की मी त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा सर्वोपरी प्रयत्न केला आहे, असे मत यावेळी सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.