लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यसभा खासदार झालो तरी माझे पाय जमिनीवरच आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल 'लोकमत' कार्यालयात झालेल्या मुलाखत कार्यक्रमावेळी सांगितले.
तानावडे यांनी बुधवारी 'लोकमत' कार्यालयाला भेट दिली. तळागाळातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा तसेच पक्षाने ठेवलेल्या विश्वासामुळे राज्यसभा खासदार पदापर्यंत पोहचलो. अन्यथा मी आमदारदेखील कधी होईन असे मला वाटले नव्हते, असे तानावडे म्हणाले. खासदारपद हे एका दिवसासारखे असते. पण तळागाळातील लोकांशी जोडलेले नाते हे आपल्याला राखून ठेवावे लागते. २०१२ साली मला आमदारकीचे तिकीट नाकारले म्हणून मी बंडखोरी केली नाही. पुढे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होईन, खासदार होईन हे मला अगोदर मुळीच माहीत नव्हते. पक्षाचे काम एकनिष्ठेने केल्याने या पदापर्यंत मी पोहचलो, असे तानावडे म्हणाले,
येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकेल. राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची एकी झाली तरी गोव्यात भाजपच्या यशावर परिणाम होणार नाही, मी स्वतः उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी कधीच करत नव्हतो, मी गोवाभर फिरत असल्याने काहीजणांचा तसा गैरसमज झाला होता, असे तानावडे म्हणाले.
प्रदेशाध्यक्षपदात बदल नाही
लोकसभा निवडणुकीला अवधे ८ महिने शिल्लक आहेत. तोपर्यंत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही माझ्याकडे असणार आहे. भाजप संघटनेत निवडणुकीपर्यंत काही बदल होणार नाहीत. मंत्रिमंडळातही बदल होण्याची शक्यता मला वाटत नाही, शेवटी तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असे तानावडे म्हणाले.
आजही मनस्ताप होतोय
तानावडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना काँग्रेस सरकारच्या काळात आपल्यावर पाच खोट्या तक्रारी दाखल झाल्या होत्या, असे सांगितले. बनावट सहीच्या प्रकरणातही माझ्याविरुद्धच गुन्हा होता. कारण मी अपात्रता याचिका सादर केली होती. एवढाच माझा दोष होता. पोलिस तपासावेळी मला खूप मनस्ताप झाला. माझ्यासोबत माझ्या कुटुंबाला याचा मनस्ताप सहन करावा लागला. याचा परिणाम माझ्या आरोग्यावर झाला, कदाचित त्यावेळीच मला डायबेटीस झाला असावा, असे तानावडे म्हणाले.