ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 28 - छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथील साध्वी सरस्वती यांनी बेताल वक्तव्ये करण्यापेक्षा दहा गायी पाळाव्यात, अशा शब्दात भारतीय संस्कृती रक्षा समितीने बुधवारी टोला हाणला. गोमांसाला कोणत्याही धर्माशी न जोडता गाईचे संवर्धन किती महत्त्वाचे आहे याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार व्हावा, तसेच या संबंधी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकाची कार्यवाही व्हावी, अशी मागणीही संघटनेने येथे पत्रकार परिषदेत केली.
बीफ खाणा:यांना सार्वजनिकरित्या फासावर लटकवा असे म्हणणा:या साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्याबद्दल संघटनेचे प्रमुख शैलेंद्र वेलिंगकर म्हणाले की, अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करण्याऐवजी साध्वीने दहा गायी पाळाव्यात. काहीतरी सकारात्मक गोष्टी कराव्यात, त्याचा फायदा होईल.
पार्श्वगायिका हेमा सरदेसाई यांच्या बिफचा ख्रिश्चन धर्माशी संबंध लावण्याचा केलेला प्रयत्न केविलवाणा असल्याचे ते म्हणाले. बीफचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. बीफ खाण्याशी कोणत्या धर्माचा संबंध आहे असे सांगणे म्हणजे त्या धर्माचा अवमान करण्यासारखे होईल, असे त्यांनी सांगितले. गो संवर्धनाचे फायदे काय आहे हे शास्त्रीय निकष लावून लक्षात घेतले पाहिजेत. सरकारच्या संबंधित यंत्रणांनी ते काम करावे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परिपत्रकाची कार्यवाही व्हावी. गोव्यात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा गोहत्या केली जात आहे. सरकारी मांस प्रकल्पातही मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर गोष्टी होतात असा आरोप त्यांनी केला.
प्राणिमित्र अमृत सिंग यांनीही गोव्यात गायींची क्रूरपणे आणि बेकायदेशीरपणे हत्या होत असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगितले. तचेच गोवा मांसप्रकल्पातही अनेक गैर प्रकार चालल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदेशीररित्या गोवंशाची हत्या केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.