म्हापसा : सरळमार्गे या किंवा आड मार्गे या येताना कायद्याचे उल्लंघन करून येण्यापेक्षा त्याचे पालन करून या. सहकार्य करून गोव्यात वास्तव्य करा. गोवा तुमचा आहे. त्यामुळे सुरक्षेवर भर देण्यास सहकार्य करून निवांत वास्तव्य करा व आनंदाने माघारी चला असा जणू संदेश गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी दिला आहे. पुढील किमान आठ दिवस तरी कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी जागोजागी नाक्यावर आड वाटेवर राहून सुरक्षेवर भर दिलेल्या पोलिसांनी त्यातून संदेश देत आहेत.नाताळापासून ते नवीन वर्षापर्यंत गोव्यात पर्यटकांची रिघ लागलेली असते. या दिवसात येणारा पर्यटक किना-यावर जाण्यास प्राधान्य देत असतो. खास करून उत्तर गोव्यातील कांदोळीपासून ते बागापर्यंत तसेच मोरजीपासून ते हरमलपर्यंतच्या किना-यावर जाण्यास तो भर देत असतो. फिरणे सोयीस्कर ठरावे यासाठी स्वत:ची वाहने घेऊन हे पर्यटक दाखल होत असतात. त्यामुळे या काळात गोव्यातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण तणाव पडलेला असतो. वाढलेल्या या तणावाच्या काळात पर्यटकांसोबत स्थानिकांना कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. किनारी भागात तर त्यांचा जास्त प्रमाणावर वापर केला जात आहे.गोव्यात दाखल होत असलेले तसेच नव्याने आलेले पर्यटक रस्ता माहीत नसल्याने सरळ मार्गी किंवा प्रमुख रस्त्याचा वापर करीत असतात; पण अनेक वेळा येऊन गेलेले पर्यटक वाहनांच्या होणा-या गर्दीतून वाट काढणे सोयीस्कर ठरावे किंवा कायद्यापासून पोलिसांच्या जाचापासून सुटका करून घेण्यासाठी आड मार्गाचा कमीत कमी वाहतूक असलेल्या मार्गाचा वापर करतात. आड मार्गाने जाताना गैरप्रकार करण्यावर भर देत असतात. हे प्रकार थांबावे नियंत्रणात राहावे यासाठी पोलिसांकडून सरळ मार्गाबरोबर आड मार्गावरही देखरेख ठेवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. तपासणी करताना त्यातून येणा-या पर्यटकांना त्याचा त्रास होणार नाही किंवा रस्त्यावरील इतर वाहन चालकांची अडवणूक होणार नाही याची दक्षता बाळगली जात आहे.कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी या संबंधी दिलेल्या माहितीनुसार वाहतुकीत सुसूत्रता रहावी दुस-यांना अडथळे निर्माण होऊ नये तसेच इतरांना त्रास होऊ नये यासाठी ही उपाय योजना करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातून कोणालाही कसल्याच प्रकारचा त्रास केला जात नसल्याचे ते म्हणाले. पोलीस हे लोकांच्या सहकार्यासाठी त्यांच्या मदतीसाठी असल्याने प्रत्येकाने या दिवसात त्यांना मदत करावी, असे मत म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी व्यक्त केले.
सुरक्षित या, सुरक्षित रहा, सुरक्षित चला, पोलिसांचा पर्यटकांना संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 7:11 PM