पणजी - गोव्यात पहिल्यांदाच साहस चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १० डिसेंबर रोजी पणजीतील मॅकनीज पॅलेसमध्ये होणा-या या महोत्सवात ३० साहसी चित्रपटे प्रदर्शीत केली जाणार आहेत.
ऑफ ट्रेल एडवेन्चर्स, गोवा हायकींग असोसिएशन, आणि भारतीय माउन्टेनीअरिंग फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ३० चित्रपटांपैकी १४ चित्रपट हे दिल्ली इथे झालेल्या इंडियन माउंडेनफिल्म फेस्टिवल इंडिया ट्युर २०१७ मधून घेण्यात आलेले अहेत. गोव्यातीलही ७ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शीत केले जाणार आहेत अशी माहिती महोत्सवाच्या संचालक बिना डायस यांनी दिली.
एकूण ३० चित्रपटांपैकी स्पर्धेसाठी केवळ १४ चित्रपट निवडले जातील. पहिल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांना रोख बक्षिसे दिली जातील. या चित्रपट महोत्सवात चित्रपट प्रदर्शनाव्यतिरीक्त छायाचित्र प्रदर्शनाची स्पर्धाही ठेवण्यात आली आहे. साहस दर्शक छायाचित्रांचे हे प्रदर्शन असून त्यासाठी आतापर्यंत ८० छायाचित्रे आली आहेत. त्यापैकी प्रदर्शनासाठी ४० छायाचित्रांची निवड केली जाणार आहेत. त्यातील तीन उत्कृष्ठ छायाचित्रांना रोख बक्षिसे दिली जातील असे डायस यांनी सांगितले.
हे महोत्सवाचे पहिलेच वर्ष असले तरी ही सृंखला चालूच राहणार असून येत्या वर्षी महोत्सव अधिक चांगल्या पद्धतीने आणि अधिक व्यापक प्रमाणात साजरा करण्याचा विचार असल्याचे गोवा हायकिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले.