लोकमत न्यूज नेटवर्क, सांगे : राज्यात रविवारपासून जोरदार पाऊस झाल्याने पर्यटकांना आकर्षित करणारे साळावली धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक सौंदर्य अधिक फुलले आहे. राज्यात सध्या पर्यटकांसह स्थानिकही पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.
साळावली धरण 'ओव्हर फ्लो' झाल्याने तेथील नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता साळावलीच्या दिशेने वळू लागली आहे. राज्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे तेरा दिवस आधीच हे धरण भरले होते. त्यात रविवार (दि. ७ जुलै) दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी हे धरण ओव्हर फ्लो झाले. आता हा नजराणा पाहण्यासाठी पर्यटक हळूहळू धरणाकाठी येऊ लागणार आहेत. गेल्या वर्षी २० जुलै २०२३ रोजी धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्या तुलनेत यंदा तेरा दिवस लवकर धरण ओव्हर फ्लो झाले.
पावसाळी पर्यटनासाठी साळावली धरण प्रसिद्ध आहे. ४२ मीटर उंचीचे पाणी धरणात भरल्यानंतर गोलाकार अशा भिंतीवरून पाण्याचा विसर्ग होताना त्यातून उडणारे पाण्याचे कारंजे अंगावर झेलण्यास पर्यटक धरणावर गर्दी करीत असतात. त्यामुळे हे धरण कधी ओव्हर फ्लो होते, याची पर्यटकांना प्रतीक्षा असते. सुरक्षेच्या दृष्टीने धरणावर वाहने घेऊन जाता येत नसली तरी मोठ्या प्रमाणात धरणाच्या दोन्ही बाजूने पर्यटक आपली वाहने पार्क करून नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी गर्दी करतात.
पर्यटकांसाठी सरकारने सुविधा उभारण्याची मागणी
दक्षिण गोव्यातील पावसाळी पर्यटनापैकी साळावली धरण मुख्य केंद्र असले तरी तेथे आवश्यक सुविधा नाहीत. पाजिमाळ सांगे येथील तीन रस्त्यावर साळावली धरण आणि बॉटनिकाल गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी अद्याप स्वागत कमानी उभारली नाही. पाजिमाळ जंक्शन ते साळवलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विद्युत दिवे नाहीत. खाण्या-पिण्याची सुविधा उपलब्ध नाहीत.
वाहनाची सुविधा देणे आवश्यक
धरणाचा आनंद लुटण्यासाठी अबालवृद्ध येत असतात. ज्येष्ठ नागरिकांना वाहनाविना चालत जाणे शक्य होत नसल्याने जलसंपदा खात्याने किमान दोन इलेक्ट्रिक रिक्षा किंवा अन्य वाहनांची सोय करणे आवश्यक आहे. त्यातून सरकारला अधिक महसूल मिळेल व पर्यटकांचीही चांगली सोय होईल.
नोव्हेंबरपर्यंत असते ओव्हर फ्लो
धरणाच्या निमित्ताने बॉटनिकाल गार्डनमध्ये पर्यटकांना फेरफटका मारता येतो. जुलै महिन्यात सुरू होणारा साळवलीचा ओव्हर पत्लो साधारणतः नोव्हेंबरपर्यंत सुरूच असतो. त्याशिवाय कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरूच असतो.