पणजी : साळगाववासीयांनी महापालिकेचे कचरावाहू ट्रक अडविल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून पणजीवासीयांनी साळगाव, कळंगुट, बागा येथून टोंक करंझाळेच्या मलनिस्सारण प्रकल्पात येणारे सांडपाण्याचे २८ टँकर्स बुधवारी रोखून माघारी पाठवले. साळगावच्या प्रकल्पात जोपर्यंत पणजी, ताळगावचा ओला कचरा स्वीकारला जात नाही तोपर्यंत साळगाव, कळंगुटचा एकही टँकर पणजीत येऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना महापौर उदय मडकईकर म्हणाले की, ‘पणजीत होणारा कचरा केवळ पणजीवासीयांकडूनच होतो असे नव्हे. राजधानी असल्याने राज्यभरातून येथे लोक येतात. शिवाय पर्यटकही येत असतात. कच-याच्या बाबतीत आमदार जयेश साळगावकर व बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांच्यात जर का मतभेद असतील तर ते त्यांनी आपापसात मिटवायला हवेत. दोघांच्या वादात तिस-याला लक्ष्य केले जाऊ नये. साळगांव, कळंगुटमधून सांडपाण्याचे 60 हून अधिक टँकर्स रोज टोंक येथील मलनिस्सारण प्रकल्पात येतात. यामुळे टोंक येथील रस्ते खराब झालेले आहेत. मात्र आम्ही सहकार्याच्या भावनेने आजवर गप्प होतो. गेले दोन दिवस साळगांवमध्ये आमचा ओला कचरावाहू ट्रक अडवून ठेवला त्यानंतर आम्ही ट्रक पाठवलेले नाहीत. जशास तसे या न्यायाने आम्हीही वागू. आमचा कचरा न स्वीकारल्यास साळगांवचा एकही टँकर शहरात येऊ देणार नाही, वाहतूक पोलिसांना सांगून पणजीच्या प्रवेशव्दारावरच ते अडवू, असे महापौरांनी सांगितले.
मडकईकर यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सुमारे ३८ टन ओला कचरा रोज शहरात निर्माण होतो. त्यातील १0 टन साळगांव येथे प्रक्रिया प्रकल्पात पाठवला जातो. दिवसाकाठी महापालिकेचा एक ट्र कचराच साळगांवला जातो तर ताळगांवहून रोज सुमारे ५ टन ओला कचरा साळगांवला पाठवला जातो. गेले दोन दिवस तेथून आमचे ट्रक माघारी पाठवण्यात आले त्यामुळे आता आम्ही ते पाठवणे बंद केले. नाईलाजाने त्यांचे सांडपाण्याचे टँकर्स अडवावे लागले. यात रेइश मागुश पटट्यातील कॅसिनो जहाजांच्या सांडपाण्याचाही समावेश असतो.