म्हापसा : ज्या प्रकल्पामुळे गोव्यातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर झाली तसंच देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरलेला साळगाव येथील घन कचरा प्रकल्पाची क्षमता १२५ टन प्रती दिन वरुन २०० टन करण्यात येणार आहे. जर्मनीतील तंत्रज्ञानाचा वापर करून साळगाव पठारावर विक्रमी वेळेत तयार करुन दिड वर्षापूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या या प्रकल्पात सुरुवातीला दिवसा ५० टन कचऱअयावर प्रक्रिया करण्यात येत होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रकल्पाच्या कामाला शुभारंभ झालेला. तसेच त्यावर १४६ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले. आता दिड वषार्नंतर दिवसाला १२५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असून पुढील महिन्याभरात ती वाढवून २०० टन प्रती दिन करण्यात येणार असल्याची माहिती घन कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो यांनी दिली.
म्हापसा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून देशातील अनेक राज्यांच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाची पहाणी केली आहे. सध्या या प्रकल्पातून तयार होणाऱ्या बायोगॅस इंधनाचा वापर बसगाड्यांसाठी प्रायोगीक तत्वावर करण्यात येत आहे. कदंब महामंडळाने स्वीडनच्या स्कॅनिया या कंपनीशी हातमिळवणी करुन देशातील पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम येथील इंधन वापरुन ऑगस्ट महिन्यात सुरु केला होता.
प्रकल्पाची क्षमता वाढवण्यापूर्वी त्याचे पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यात येणार असून परवानगी मिळाल्यानंतर क्षमता वाढवण्यात येणार आहे. सध्या प्रकल्पात एकाच पाळीवर कामगार काम करतात. ती वाढवून दिवसाला दिड पाळीवर काम करण्यात येणार असल्याची माहिती लोबो यांनी दिली. या प्रकल्पामुळे उत्तर गोव्यातील किनारी भागातल्या कचरा प्रश्नावर तोडगा काढणे शक्य झाले आहे. किनाऱ्यावरील बऱ्याच भागात कचऱ्याची समस्या दूर झाली असली तरी काही ठिकाणी सुविधांच्या अभावी कचरा व्यवस्थित गोळा केला जात नसल्याचे ते म्हणाले. काही पंचायतींना सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच कचºयाच्या वर्गीकरणा संबंधी जागृती होणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
उत्तर गोव्यासाठी अशा प्रकारच्या आणखीन एका प्रकल्पाची गरज आहे. हा प्रकल्प झाल्यास उत्तर गोव्यातील कचºयाची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. राजधानी पणजीपासून जवळ असलेल्या बायंगिणी येथे नवीन प्रकल्प बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे तिसवाडी तालुक्यातील कचºयाची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती मायकल लोबो यांनी दिली.