फोंडा : कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याचे गोव्यातील सनातन संस्थेशी लागेबांधे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या संदर्भात एटीएसचे विशेष तपास पथक मंगळवारपासून फोंडा पोलिसांच्या संपर्कात आहे. संशयित समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक असून त्याची पत्नीही सनातनची साधक आहे. ती गोव्यातील रामनाथी-बांदोडा येथील सनातन आश्रमात वास्तव्याला असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली असून तिला अटक करण्याच्या प्रयत्नात एटीएस असल्याचे सूत्रांनी सांगितले. आश्रमाशी संपर्क साधला असता, संशयित समीर गायकवाड याची पत्नी रामनाथी येथील एका फ्लॅटमध्ये राहात असून सध्या ती बेळगाव येथील आपल्या माहेरी गेल्याचे सांगण्यात आले. सनातन आश्रमाचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी समीर गायकवाड हा निर्दोष असून पोलिसांनी त्याला नाहक या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला. यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणीही पोलिसांनी सनातनच्या अनेक साधकांची चौकशी केली होती. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते. याही प्रकरणातून समीर गायकवाड सहीसलामत बाहेर निघेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. संशयित समीर गायकवाड याची पत्नी गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या बेळगाव येथील माहेरी गेल्याचे मराठे यांनी सांगितले. समीर व त्याच्या पत्नीमधील वैवाहिक संबंध बिघडल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ते विभक्त राहात होते. तसेच समीरची पत्नी गेल्या तीन वर्षांपासून गोव्यातील सनातन आश्रमात वास्तव्याला होती, अशी माहितीही मराठे यांनी दिली. मात्र, पती-पत्नीमधील संबंध बिघडल्यामुळे त्यांच्यात घटस्फोटासाठी न्यायालयीन लढाई सुरू असून गेल्या तीन वर्षांपासून समीर सनातन आश्रमात आला नसल्याचा दावा त्यांनी केला. फोंडा पोलिसांशी संपर्क साधला असता, एटीएसचे विशेष पथक काल फोंड्यात आल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही हे पथक फोंड्यातच असून संशयित समीर गायकवाड याच्या पत्नीचा शोध घेत आहे. (प्रतिनिधी)
‘सनातन’ पुन्हा संशयाच्या घेऱ्यात
By admin | Published: September 17, 2015 3:19 AM