- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: डॉ. नरेंद्र दाभोळकर, पत्रकार गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्येचा संबंध असल्याच्या वहिमावरुन सध्या सनातन संस्थेकडे बोट दाखविले जात असतानाच गोव्यात भाजपा सरकारच्या आघाडीचा घटक असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी सनातन संस्थेला ‘क्लीन चीट’ दिली आहे. सनातनसारखी अध्यात्मिक संस्था अशा कृत्यात सामील असूच शकत नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.गोव्यातील एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सनातनशी आपला संबंध असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. आपली पत्नीही या संस्थेच्या कामाशी संलग्न आहे. ही संस्था कशी काम करते हे मी जवळून पाहिले आहे. या संस्थेत मला काही आक्षेपार्ह सापडलेले नाही. मात्र काही घटक विनाकारण या संस्थेला बदनाम करत आहेत असे ते म्हणाले.दीपक ढवळीकर यांचे भाऊ आणि गोवा सरकारातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांचा तसेच त्यांच्या पत्नीचाही या संस्थेशी संबंध आहे. ढवळीकर यांनी सनातन संस्थेची नेहमीच पाठराखण केली आहे, याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, ही संस्था अध्यात्मिक आणि धार्मिक काम करणारी आहे. देशाला अशा संस्थेची गरज आहे, केवळ मीच नव्हे तर या संस्थेच्या कार्याची प्रशंसा आयुषमंत्री श्रीपाद नाईक तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही केलेली आहे. त्यांची छापून आलेली वक्तव्ये माझ्याकडे उपलब्ध आहेत.विचारवंतांच्या हत्येप्रकरणी ज्या संशयितांना अटक केली आहे, त्यांचा सनातन संस्थेशी संबंध आहे. याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, काही कार्यकर्त्यांना अटक केली म्हणून संस्था या कारस्थानात सामील आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कित्येकवेळा घरातील मुले वाया जातात. मात्र त्यासाठी त्यांच्या पालकांना जबाबदार धरणे योग्य आहे का, असा प्रश्न करतानाच न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सनातनचा या प्रकरणात कुठलाही हात नसल्याचे स्पष्ट होईल. न्यायालयात ही संस्था दोषी ठरल्यास त्यांच्यावर आरोप करा, अन्यथा अशा आरोपात तथ्य नाही असे ते म्हणाले.