लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : सनातन हिंदू धर्म वाढवायचा, टिकवायचा व पुढे न्यायचा असल्यास नवीन वर्षात संकल्प करून पुढे जाऊया. या कार्यात झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करायला हवे. त्याची सुरुवात स्वतःपासून करा. तेव्हाच हा संकल्प फळाला येणार. त्यासाठी आवश्यक वेळी सरकारचे योग्य ते सहकार्य मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी येथे नववर्ष स्वागत सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नववर्ष स्वागत समितीतर्फे शोभयात्रा व ध्वजपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. के.बी. हेडगेवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सादर करून या शोभयात्रेत उत्साह निर्माण केला. कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह नगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, समितीच्या अध्यक्षा राधिका कामत सातोसकर उपस्थित होत्या.
शोभयात्रा साखळी शहरातून गोकुळवाडी येथील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थानात दाखल झाल्यानंतर घंटानाद झाला. त्यानंतर आयोजित औपचारिक कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रमुख वक्ते योगशिक्षक संदेश बाराजणकर, नगराध्यक्ष राजेश सावळ नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा राधिका कामत सातोसकर, सचिव अभय बर्वे, उपाध्यक्ष सुशांत पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख वक्ते संदेश बाराजणकर यांनी भारतीय संस्कृती जपत असताना अभिमान बाळगायला हवा. भारत या नावातच तेज असल्याने राष्ट्रप्रेमही असावे. आमच्या संस्कृतीबाबत गैरसमज आज पसरविले जात आहेत. त्यामुळे लोकांनी या गोष्टींकडे दर्लक्ष करावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत अध्यक्षा राधिका कामत सातोसकर यांनी केले. सूत्रसंचालन नगरसेविका शुभदा सावईकर यांनी केले, तर अभय बर्वे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
आता स्वस्थ भारत बनविण्याचा संकल्प
प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. प्रत्येकाने पुढे येऊन हे काम आपल्या हाती घ्यावे. ज्यावेळी सरकारची मदत भासणार तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी असेल. तसेच आपल्या आरोग्याकडे आजच्या काळात जास्त लक्ष द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छ भारत ते आता स्वस्थ भारत या मंत्रावर या नवीन वर्षारंभी स्वस्थ राहण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"