पणजी : पुरोगामी विचारवंतांच्या हत्येप्रकरणी चर्चेत असलेल्या सनातन संस्थेवर बंदीची शक्यता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी फेटाळली. ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या साधकास महाराष्ट्र पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्रासह गोव्यातूनही सनातन संस्थेवर बंदीची मागणी होत आहे. भाजपचे आमदार विष्णू वाघ यांच्यासह अनेकांनी बंदीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मात्र बंदीची शक्यता फेटाळली. मुख्यमंत्री म्हणाले की, संस्थेच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या चुकीसाठी पूर्ण सनातन संस्थेला दोष देणे हे आपल्याला पटत नाही. पानसरे हत्या प्रकरण हे गोव्यात घडलेले नाही. महाराष्ट्र सरकार या प्रकरणी चौकशी करत आहे. त्यांचे चौकशीचे काम अगोदर पूर्ण होऊन अहवाल येऊ द्या. (खास प्रतिनिधी) दहशतवादी संघटना जाहीर करा : कॉँग्रेस पणजी : सनातन संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करा, अशी मागणी गोवा कॉँग्रेस पक्षातर्फे निवेदनाद्वारे पंतप्रधान आणि केंद्रीय गृह मंत्र्यांच्या कार्यालयाकडे केली आहे. ही माहिती कॉँग्रेसचे सचिव सुनील कवठणकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. (खास प्रतिनिधी) मागणी पूर्वग्रहकलुषित पणजी : आमदार विष्णू वाघ यांची सनातन संस्थेवरील बंदीची मागणी पूर्वग्रहकलुषित स्वरूपाची आहे. एखाद्या सदस्याच्या चुकीमुळे सनातन संस्थेवर बंदी घालणे अनुचित आहे, असे विधान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले होते. त्यामुळे पक्षबदलू प्रतिमा असलेल्या वाघांच्या प्रतिक्रियेला महत्त्व किती द्यायचे, हे ठरवता आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेच्या साधिका शुभा सावंत यांनी वृत्तसंस्थेला दिली.
सनातनवर बंदी नाही : मुख्यमंत्री
By admin | Published: September 24, 2015 1:30 AM