पणजी : सनातन संस्थेला ढवळीकर बंधूंनी आणि सरकारने पाठिंबा द्यावा हे निषेधार्ह आहे, असे आम आदमी पक्षाने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सनातन संस्थेच्या सनातन प्रभात या दैनिकाला जाहिराती देणे सरकारने त्वरित थांबवावे, अशीही मागणी आपने केली आहे. सनातन प्रभात हे पत्रकारितेच्या चौकटीत बसतच नाही. त्यातून बिगर हिंदू धर्मीय लोकांची प्रतिमा मलीन केली जाते. अशा दैनिकाला मंत्री दीपक ढवळीकर व सुदिन ढवळीकर यांनी जाहिरातींच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मदत करणे हे निषेधार्ह आहे, असे आपने म्हटले आहे. ढवळीकर बंधूंचे विचार संकुचित असल्याने त्यांनी सनातन संस्थेला पाठिंबा देणे हे त्यांच्या विचारसरणीत बसते, असाही टोला आपने लगावला आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेही वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार करत आहेत. सनातन संस्थेच्या एखाद्या साधकाने चूक केली म्हणून पूर्ण संस्थेवर बंदी लागू करता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र, पानसरे हत्या प्रकरणापूर्वी मडगाव बॉम्बस्फोटातही सनातनचे साधक होते व ठाणे येथील बॉम्बस्फोट प्रकरणीही सनातनच्या दोघा साधकांना दहा वर्षांची शिक्षा झालेली आहे, हे मुख्यमंत्री पार्सेकर यांना ठाऊक नाही काय, अशी विचारणा आपने केली आहे. सनातन संस्थेवर बंदी यायला हवी व त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे तशी मागणी करावी, असे आपने म्हटले आहे. दरम्यान, भाजपचे आमदार विष्णू वाघ यांनीही सनातनवर बंदी घालण्याची आपली मागणी कायम ठेवली आहे. सरकारने सर्व दृष्टिकोनांतून चौकशी करावी. राज्यातील ज्या राजकारण्यांचे संबंध सनातन संस्थेशी आहेत, त्या राजकारण्यांचीही चौैकशी व्हावी, अशी मागणी आमदार वाघ यांनी गुरुवारी केली आहे. (प्रतिनिधी)
सनातनप्रश्नी आपची सरकारवर टीका
By admin | Published: September 25, 2015 2:18 AM