पणजी: येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना गोव्यात दोन्ही जागा लढविणार असल्याचे गोवा शिवसेनेचे प्रभारी खासदार संजय राऊत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. गोवा सुरक्षा मंचाशी असलेली युती कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले ‘येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे गोव्यात उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असणार आहेत. या बाबतीत शिवसेना आणि सुभाष वेलिंगकर यांची बाठक मुंबईला झाली आहे. गोसुम लोकसभा निवडणुकीत रिंगणात असणार नाही, परंतु शिवसेनेच्या उमेदवारांना मंचाचा पाठिंबा राहणार आहे. कारण गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेची युती आजही अस्तित्वात आहे’.महाराष्ट्रात शिवसेना सरकारात असली तरी सेनेची भाजपबरोबर युती नाही आहे. येत्या लोकसभा निवडणुकीतही युती राहणार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतही ती नव्हती. निवडणुकीनंतर अस्थीरता संपविण्यासाठी सेना सरकारात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात विविध मुद्यावर भुमिका घेण्यासाठी गोवा सेनेला पूर्ण स्वातंत्र्य असल्याचेही त्यांनी सांगितले. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा गोवा विधानसभा संकुलात उभारण्याची सेनेच्या मागणीविषयी विचारले असता त्यांनी हे सांगितले.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीचे प्रदुषण महागात पडल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या आजारामुळे गोव्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून त्यांची जागा घेणारा दुसरा कुणीही पात्र नेता भाजपात नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरी फळी निर्माणच करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आजारामुळे पक्षात आणि सरकारातही नैराश्य पसरले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृति लवकर सुधारून ते लवकर बरे होवू देत अशा शुभेच्छा ही त्यांनी व्यक्त केल्या.
जितेश कामत राज्यप्रमुखजितेश कामत यांची शिवसेनेचे गोवा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राऊत यांनी केली. यापूर्वी त्यांच्याकडे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रवक्ते राखी प्रभुदेसाई, संपर्क प्रमुख जीवन कामत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.