पणजी : गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तांत्रिक बिघाडाचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. या कारखान्याला जणू ‘ग्रहण’च लागले आहे. कंडेन्सर पंप निकामी झाल्याने तीन दिवस कारखाना बंद ठेवावा लागल्याने ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कंडेन्सर पंप दुरुस्त करण्यास स्थानिक अभियंत्यांना अपयश आल्याने अखेर पुणे येथील वसंतदादा साखर कारखान्यातून तज्ञांना पाचारण करावे लागले.
नोव्हेंबरमध्ये 20 दिवस कारखाना बंद होता त्यानंतर सलग दुस-यांना हा कारखाना बंद ठेवावा लागला. ऊस कापून कारखान्यासाठी पाठवला होता परंतु तो पडून राहिल्याने शेतक-यांचे नुकसान झाले. उन्हात ऊस कोरडा झाल्याने वजन घटले आणि त्यामुळे उत्पादकांना योग्य भाव मिळाला नाही. भर मोसमात कारखाना बंद ठेवावा लागला. ऊस भरलेले अनेक ट्रक आपला नंबर कधी लागतो याच्या प्रतीक्षेत असल्याचे ऊस उत्पादक राजेंद्र देसाई यांनी सांगितले.
कारखान्याचे प्रशासक दामोदर मोरजकर यानी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून आलेले तज्ञ काही दिवस येथेच राहतील आणि कारखान्याच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवून असतील. यंदा मुळातच गळीत हंगाम उशिरा सुरु झाला. 71 दिवस गाळप आतापर्यंत झाले असून सुमारे 59,790 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झालेले आहे. यात 34,766 मेट्रिक टन ऊस गोव्याचा तर 26, 046 मेट्रिक टन ऊस शेजारी राज्यातील आहे. चालू मोसमात आतापयंंत 47,820 मेट्रिक टन सागर उत्पादन झालेले आहे. या गाळपातून सुमारे 8.10 टक्के इतका उतारा मिळाला.
दरम्यान, कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च येतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे. त्यांना या क्षेत्रात तब्बल 34 वर्षांचा अनुभव आहे.