लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोव्यात भाजप संपलेला नाही, असा दावा करून पल्लवी धेंपे यांचा पराभव ख्रिस्ती धर्मगुरूंच्या हस्तक्षेपामुळेच झाला आहे, असा आरोप भाजपचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केला.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, खिस्ती धर्मगुरूंनी भाजपविरोधात कारवाया केल्या. दक्षिण गोव्यात भाजप अजून संपलेला नाही. काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांना मिळालेली आघाडी शेखी मिरवण्यासारखी मुळीच नाही. राज्यभरात २७ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला मताधिक्य मिळालेले आहे. दक्षिण गोव्यातही अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये जिथे काँग्रेसला जास्त मते अपेक्षित होती तिथे ती बरीच कमी झालेली आहेत.
संकल्प आमोणकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आधी चर्च संस्थेच्या बड्या प्रतिनिधींनी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना चर्चेसाठी बोलावले; परंतु बैठक संपल्यानंतर एकत्रपणे फोटो काढू, अशी विनंती तानावडे यांनी केली, तेव्हा या प्रतिनिधींनी फोटो काढण्यास नकार दिला. यावरून त्यांच्या मनात भाजपबद्दल असलेला गैर हेतू उघड होतो. भाजपची साथ देण्याचे मनात नव्हते, तर प्रदेशाध्यक्षांना बैठकीसाठी का बोलावले?, असा सवालही संकल्प यांनी केला.
आमदार संकल्प आमोणकर म्हणाले की, 'बिघाडी' सुरू झाल्यावर आता 'इंडिया वाले आरजीला सोबत घेऊ पाहत आहेत. मात्र, दुसरीकडे या पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांचे भवितव्य धोक्यात असल्याच्या वावड्या हे विरोधकच उठवत असून त्यांनी काँग्रेसपासून सावध राहावे.
भाजपचा पराभव त्यांच्या केडरनेच केला
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, भाजपनेच खरे तर दक्षिणेतील पराभवावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. चर्चने प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका घेतलेली आहे. भाजपला चर्चच्या भूमिकेचा ज्यावेळी फायदा झाला तेव्हा नेते गप्प राहिले. आता दक्षिणेत पराभवाचे खापर ख्रिस्ती धर्मगुरूंचर फोडले जात आहे. प्रत्यक्षात भाजपचा पराभव त्यांच्या केडरनेच केला आहे. पसंतीचा उमेदवार न दिल्याने भाजप केडरने काँग्रेसला मते दिली. तसेच बहुजन समाजही काँग्रेससोबत राहिला, हे सत्य मान्य न करता खिस्ती धर्मगुरूंना दोष दिला जात आहे.
'बिघाडी' सुरू झालीय
'इंडिया' आघाडीवर टीका करताना आमोणकर म्हणाले की, आघाडीत आतापासूनच बिघाडी सुरु झाली आहे. बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत ती दिसून आली. रॉयला फर्नाडिस यांना वेगळी चूल मांडावी लागली. काँग्रेसमध्ये राजकीय भवितव्य घडवू इच्छिणाऱ्यांना आघाडीमुळे वाईट दिवस आले आहेत. इंडिया आघाडी यापुढे मुळीच टिकणार नाही, असे भाकीतही त्यांनी केले.
'इंडिया' आघाडीत आता काहीच आलबेल नाही...
भाजपचे प्रवक्त्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी विरोधक एकत्र असूनही उत्तर गोव्यात काँग्रेस उमेदवाराची मते २०१९ च्या १,६४,००० च्या तुलनेत यावेळी १,४१,००० पर्यंत खाली का आली? असा सवाल केला. इंडिया आघाडीमध्ये आलबेल राहिलेले नाही, अशी टीका त्यांनी केली, तसेच दक्षिण गोव्यात भाजपला ख्रिस्ती धर्मगुरूंमुळेच पराभव झाल्याचा आरोप करून ते म्हणाले की. अरुणाचल प्रदेशमध्ये ख्रिस्ती बहुसंख्य असूनही तेथे भाजपला दोन तृतियांश बहुमत मिळाले. केरळ, ओडिशातही हीच स्थिती आहे.
हा निव्वळ पलायनवाद...
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सुनील कवठणकर म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमधील भ्रष्टाचार, उद्दामपणा, पक्षांतरांना प्रोत्साहन देण्याच्या घटना तसेच संविधानविरोधी कृत्यांमुळे भाजपने दक्षिण गोव्याची जागा गमावली. या पराभवाची जबाबदारी न स्वीकारता भाजपने पलायनवादी वृत्ती आरंभली आहे. मात्र गोव्यात द्वेषाचे आणि फुटीरतेचे राजकारण चालत नाही हा धडा भाजप अजूनही शिकलेला नाही.