लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: सांकवाळ ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी रविवारी पंचायतीजवळ जमून भुतानी इन्फ्रा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे गावाच्या हितासाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांची विनाकारण केली जाणारी बदनामी थांबवावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे उपोषणाला बसल्याचे खोटे नाटक करीत असल्याचा आरोप माजी सरपंच नारायण नाईक, रॉकी वालिस आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गावस यांनी केला. पंचायतीजवळील शौचालयात जाऊन ते खाद्यपदार्थ खाण्यासह मद्यसेवन करीत असल्याचा व्हिडीओ त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना दिला, तर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा इतरांनी हे आरोप फेटाळत व्हिडीओ काढणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.
सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे आठवडाभर भुतानी इन्फ्रा प्रकल्पाला दिलेला बांधकाम परवाना रद्द करावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास, आमदार कुज सिल्वा, माजी मंत्री मिकी पाशेको आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार वास, कुज सिल्वा, सांकवाळचे पंच तुळशीदास नाईक, पंच मोरिलियो कार्व्हलो, माजी मंत्री पाशेको, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, मुरगावचे माजी नगराध्यक्ष शरद चोपडेकर, प्रतिमा कुतिन्हो, ओलेंन्सियो सिमोईस आदींनी भुतानी इन्फ्रा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. दरम्यान, व्हिडीओ लोकांसमोर आणणाऱ्या माजी सरपंच नारायण नाईक, रॉकी वालिस आणि सुनील गावस यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. या प्रकरणात पोलिस तक्रार करणार असल्याची माहिती प्रतिमा कुतिन्हो यांनी दिली. तर पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतल्याची माहिती पिटर डिसोझा यांनी दिली. दरम्यान, पत्रकार परिषदेत माजी सरपंच नारायण नाईक, रॉकी वालिस आणि सुनील गावस उपस्थित होते.
संबंधितांवर गुन्हे दाखल करा
शौचालय ही खासगी जागा आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमरे, छुपे कॅमेरे लावणे हा गुन्हा आहे. महिलांचेही शौचालयातील रेकॉर्डिंग झाले असेल. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो असे सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले. पोलिसांनी शौचालयात कॅमेरा लावल्याप्रकरणीही संबंधितांवर तातडीने गुन्हा नोंद करावा, अशी मागणी त्यांनी केली.
बदनामी थांबवा : ग्रामस्थ
दरम्यान, प्रेमानंद नाईक यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे सायंकाळी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. व्हिडीओ ऑगस्ट महिन्यातील असल्याचे दिसते. विनाकारण होणारी बदनामी थांबवावी. त्या शौचालयाचा प्रेमानंद यांनीच नव्हे, तर उपोषणस्थळी काही महिलांनीही वापर केला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, असे लोकांनी सांगितले.
उपोषण नव्हे फसवणूक
सांकवाळचे माजी सरपंच प्रेमानंद नाईक हे उपोषणाला बसले आहेत. मात्र, ते उपोषणाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करीत आहेत. शौचालयात जाऊन खाद्यपदार्थ खाण्यासह मद्यपान करीत असल्याचा व्हिडीओ मिळाल्याचा आरोप माजी सरपंच नारायण नाईक, रॉकी वालिस आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गावस यांनी पत्रकार परिषदेत केला. नाईक खाद्यपदार्थ खात असल्याचा व्हिडीओ आणि फोटो त्यांनी पत्रकारांना दिले. नाईकलोकांची फसवणूक करत असल्याचे उघड झाल्याचे सुनील गावस म्हणाले.