नारायण गावसपणजी: सांताक्रुझ पंचायतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या ग्रामसभेत पंचायत मंडळाने जुगाराला पाठीबा दिला असा आरोप माजी सरपंच मारियानो यांनी करुन पंचायत खात्यात याचिका दाखल केली आहे. तसेच सांताक्रुझच्या विद्यमान सरपंचांनी पंचायत खात्यात या विषयी सुनावणी सुरु असून निवडणूकीत पराभव झाल्याने माजी सरपंच विनाकारण आरोप करत आहे असे स्पष्टीकरण दिले आहे.
सांताक्रूझ पंचायतीत झालेल्या मागच्या ग्रामसभेत पंचायत मंडळाने ग्रामसभेत जुगाराला पाठींबा दिला हे त्या ठिकाणी व्हिडीओ रिकोर्ड करत असलेल्या पत्रकारांनीही पाहिले आहे. पण पंचायत मंडळाने अशी चर्चा झाली नाही असे आरोप करत काही प्रसारमाध्यमांनी चुकीची माहिती प्रसिद्ध केली म्हणून स्पष्टीकरण मागले हाेते. तसेच आमदार विजय सरदेसाई यांनी अधिवेशनावेळी आवाज केला होता. त्यांच्यावर पंचायत मंडळाने आरोप केले होते. या विरोधात आम्ही सांताक्रुज पंचायत मंडळा विरोधा पंचायत खात्यात याचिका सादर केली आहे. १० नोव्हेबरला त्याची सुनावणी आहे, असे माजी सरपंच मारियानो डी आरुझो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्याच्या सोबत माजी सरपंच प्रसाद नाईक व इतर उपस्थित होते.
पंचायत खात्यात याचिका सादर करुन अजुन त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याने पंचायत खाते हलगर्जीपणा करत असल्याचा आरोपही मारियानो यांनी केला. ग्रामसभेत सर्वाच्या समोर या विषयी चर्चा झाली आम्ही याला विरोध केला होता. तसेच चुकीची माहिती ग्रामपंचायतीच्या पुस्तकावर लिहीली आहे. यात पंचायतीचे सचिव, सरपंच तसेच उपसरपंचाही हात आहे. त्यांच्यावर याेग्य ती कारवाई झाली पाहीजे, असे मारियानो यांनी सांगितले. ही ग्रामपंचायत कॉग्रेसची आहे तर आमदर भाजपचा आहे. यामुळे कालापुर सांताक्रूझच्या लोकांचा काहीच विकास होत नाही. लोकांची कामे होत नाही गटाराची योग्य साफ सफाई केली नसल्याने चतुर्थीच्या काळात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. असा आरोप माजी सरपंच प्रसाद नाईक यांनी केला आहे.