सचिन कोरडे /गोवाजवळपास ११९ मिनिटे फुटबॉल चाहत्यांचा मनाचा ठाव घेणाऱ्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात अखेर बाजी मारली ती पश्चिम बंगालने. या सामन्याचा ‘हिरो’ ठरला तो मनवीर सिंह. दुसऱ्या अतिरिक्त वेळेत रोनाल्डोच्या पासवर मनवीरने डाव्या पायाने चेंडू जाळीत ढळलला आणि बांबोळी येथील अॅथलेटिक्स स्टेडियम सुन्न झाले. घरच्या मैदानावर विजेतेपदाची आशा बाळगणाऱ्या गोमंतकीय चाहत्यांना या पराभवामुळे हादरा बसला. कारण सामन्यात गोव्याच्या खेळाडूंनी जबरदस्त टक्कर दिली होती. मात्र क्षणात खेळ कसा बदलतो, याची प्रचिती उपस्थितांना आली. मनवीरच्या एकमेव गोलने बंगालला चॅम्पियन बनविले. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बंगालचे स्वप्न पूर्ण झाले. उल्लेखनीय म्हणजे, प्रतिष्ठेचा संतोष चषक ३२ व्यांदा जिंकण्याची किमया बंगालने साधली. त्यामुळे ‘संतोष’वर बंगाली बाबूंचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.
‘संतोष’ बंगाली बाबूंकडेच!
By admin | Published: March 27, 2017 3:40 AM