पणजी : ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत मेरशी येथे सुमारे २0 हजार चौरस मिटर जागेत ५६ कोटी रुपये खर्चून गोवा बाजार प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यात या प्रकल्पाची कोनशिला बसविली जाईल तसेच ‘सारस’ प्रदर्शनाच्या धर्तीवर स्थानिक कारागिरांसाठी प्रत्येक तालुक्यांमध्ये प्रदर्शने भरविली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या ‘सारस’ प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या येथील कला अकादमीजवळ दर्या संगमावर होत आहे. नऊ राज्यांमधील स्वयंसाहाय्य गट, कारागीर या प्रदर्शनात भाग घेतील.
याविषयी माहिती देताना ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगांवकर म्हणाले की, ‘गोवा बाजार’मध्ये स्थानिक हस्तकला वस्तूंसाठी दालने असतील. येथील कारागिरांना त्यामुळे मोठा वाव मिळेल.
१00 स्टॉल्स स्थानिक सेल्फ हेल्प ग्रुपना‘सारस’ प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या दुपारी ४.३0 वाजता होणार असून २३ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, मिझोरम, ओरिसा, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड व पंजाब या नऊ राज्यांमधील स्वयंसाहाय्य गट आणि कारागीर या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. रोज सकाळी १0 ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन लोकांसाठी खुले असेल. कला अकादमीजवळ दर्या संगमावर २00 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पैकी १00 स्टॉल्स राज्यातील स्वयंसाहाय्य महिला गटांना देण्यात आलेले आहेत आणि उर्वरित १00 स्टॉल्स अन्य राज्यांमधील स्वयंसाहाय्य गटांना दिलेले आहेत. सरकारी खाती, बँका तसेच काही कारागिरांचेही स्टॉल्स या प्रदर्शनात असतील. कृषी माल, हस्तकला वस्तू, कोल्हापूरी तसेच अन्य प्रकारची पादत्राणे, मसाला पदार्थ, बेकरी पदार्थ, वीणकाम, काथ्याच्या पिशव्या, बांबूपासून बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात असतील.
ग्रामीण भागातील कारागिरांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे हा मुख्य हेतू आहे. आयोजनाची जबाबदारी गोवा पर्यटन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्यात अशी दोन ‘सारस’ प्रदर्शने होत असतात. वरील प्रदर्शनकाळात दर्यासंगामावर रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेºयांची निगराणीही प्रदर्शनस्थळी असणार आहे. समारोप समारंभ २३ रोजी दुपारी ४.३0 वाजता होणार आहे. प्रदर्शनात जास्तीत जास्त वस्तू खपविणारा, चांगले पदार्थ असलेला तसेच उत्तम सजावट केलेल्या स्टॉलना बक्षिसेही दिली जातील.