लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेसचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. उमेदवारीबाबत चर्चा सुरू असतानाच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते, पदाधिकारी हा गुंता सोडविण्यासाठी काय करतात याकडे लक्ष लागले आहे. तूर्त विजयमुळे सार्दिनचे संभाव्य तिकीट धोक्यात आले, असे सासष्टीतील राजकीय जाणकारांना वाटते.
गोव्यातील तिकीट वाटपचा गुंता सोडविण्यासाठी हायकमांडचे प्रयत्न चालू असतानाच काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल, शनिवारी आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेऊन चर्चा केली; परंतु सरदेसाई सार्दिन नको या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे सद्यःस्थितीत त्यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडे उत्तर गोव्यासाठी प्रबळ उमेदवार नाही. तिथे रमाकांत खलप की सुनील कवठणकर असा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यात आलेले काँग्रेसचे ठाकरे यांनी काल सरदेसाई यांच्याशी एक तास चर्चा केली. सरदेसाई हे फातोर्डाचे आमदार आहेत. त्यांच्याकडे विधानसभेचा एकच मतदारसंघ असला तरी, त्यांना दुखवल्यास ते अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत करतील, अशी भीती काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते.
गोवा फॉरवर्ड हा विरोधी इंडिया आघाडीचा एक घटक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करणे हे काँग्रेसचे काम आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने कोणता उमेदवार द्यावा ते आम्ही ठरवत नाही. ते काँग्रेसनेच निश्चित करावे पण मला काय सांगायचे ते आपण ठाकरे यांच्यासमोर सांगितले आहे असे सरदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले
मी निवडणूक लढवत नसल्याने मला यात पडायचे नाही, असे सरदेसाई म्हणाले. उमेदवार काँग्रेसनेच ठरवावा, पण सार्दिन नकोत असे थेट सांगितल्याचे सरदेसाई म्हणाले आहेत.
सार्दिन-ठाकरे गुफ्तगू
दक्षिण गोव्याच्या उमेदवारीबाबत ज्याप्रमाणे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे, तसाच पेच काँग्रेसपुढे आहे. याच पार्श्वभूमीवर काल काँग्रेसचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी माणिकराव ठाकरे यांची स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या चर्चेवेळी ठाकरे यांच्याकडून सार्दिनना कोणतेही सकारात्मक आश्वासन देण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ते सरदेसाईंनाच विचारा : सार्दिन
विजय सरदेसाई यांचा तुमच्या उमेदवारीला एवढा विरोध का? तुमचे त्यांच्याशी बिनसले आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी फ्रान्सिस सार्दिन यांना केला असता ते म्हणाले की, याबाबत तुम्ही सरदेसाई यांनाच विचारले तर बरे होईल. ते आपल्यावर कोणत्या गोष्टींवरून नाराज असतील तर आपल्याला त्याची माहिती नाही.
उमेदवार पाहून निर्णय : विजय
लोकसभा निवडणुकीबाबत आपली काँग्रेसच्या नेत्यांशी यापूर्वीही चर्चा झाली आहे. तसेच काल, काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याशीही आपले बोलणे झाले आहे. फ्रान्सिस सार्दिन यांना आपला विरोध आहे. त्यामुळे काँग्रेस येत्या काळात कोणाला उमेदवारी देईल त्यावर पाठिंब्याचा निर्णय घेईन, असे सरदेसाई म्हणाले.
केवळ घोषणा बाकी
पक्षाच्या स्क्रीनिंग समितीने उमेदवारांची निवड केली आहे. केवळ घोषणा करणे बाकी आहे. अंतिम घोषणा पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतरच केली जाईल, असे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
पराभवाच्या भीतीने माघार
दक्षिण गोव्यात काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आला. दक्षिण गोव्यातून निवडणूक लढण्यास भाजपच्या दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दोन आमदारांनी माघार घेतली ती केवळ पराभवाच्या भीतीमुळेच, असा दावाही त्यांनी केला.