काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सार्दिन यांचे लॉबींग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 12:34 PM2020-12-17T12:34:38+5:302020-12-17T12:35:06+5:30
Goa Congress News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळावे म्हणून खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी लॉबींग सुरू केले आहे. सार्दिन यांनी दिल्लीतही संपर्क साधला व प्रदेशाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावण्यास आरंभ केला आहे.
पणजी - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळावे म्हणून खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी लॉबींग सुरू केले आहे. सार्दिन यांनी दिल्लीतही संपर्क साधला व प्रदेशाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावण्यास आरंभ केला आहे.
गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा यावेळी स्वीकारला जाणार आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्याकडे राजीनामा पत्र पोहचले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी काँग्रेसच्या कोणत्याच आमदाराने चोडणकर यांना सहकार्य केले नाही. फक्त विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सहकार्य केले. मात्र जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होताच आमदारांनी चोडणकर यांना दोष देण्यास आरंभ केला. यामुळे कंटाळून चोडणकर यांनी राजीनामा दिला असे चोडणकर यांचे मित्र असलेल्या काँग्रेसच्या काही माजी पदाधिकाऱ््यांनी गुरुवारी लोकमतला सांगितले.
माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, रवी नाईक, प्रतापसिंग राणे यांच्या क्षेत्रात काँग्रेसच्या काही उमेदवारांचे पराभव झाले. मात्र या आमदारांनी पराभवाची जबाबदारी घेतली नाही याची कल्पना काहीजणांनी दिनेश गुंडू राव यांना दिली आहे. चोडणकर यांनी दुसऱ््यांदा राजीनामा दिला आहे. तो स्वीकारल्यानंतर सार्दिन यांनी प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळावे म्हणून प्रयत्न चालवले आहेत. स्वत: सार्दिन यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी काँग्रेसचे काम कुठेच केले नाही. ते स्वत: दक्षिण गोव्याचे खासदार आहेत पण त्यांनी निवडणुकीवेळी कोणतीच भूमिका घेतली नाही. काँग्रेसच्या काही आमदारांना पक्षाच्या निशाणीवर जिल्हा पंचायत निवडणूक झालेली नको होती. फालेरो यांचा उमेदवार दवर्लीत पराभूत झाला. फालेरो हेही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी लॉबींग करत आहेत.
चोडणकर यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा एक गट करत असला तरी, चोडणकर हे राजीनाम्यावर ठाम आहेत. काँग्रेसची प्रदेश समिती विसर्जित झाल्यात जमा आहे.