सासष्टीत उमेदवारांना लावावी लागेल ताकद; भाजप-काँग्रेस थेट लढत शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 10:32 AM2024-04-15T10:32:28+5:302024-04-15T10:34:05+5:30
सासष्टीतून गेल्या २५ वर्षांत केवळ दोनवेळा भाजपाचा उमेदवार निवडून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : सासष्टीतून गेल्या २५ वर्षांत केवळ दोनवेळा भाजपाचा उमेदवार निवडून आला. काँग्रेस पक्षाचा उमेदवार जास्तवेळा निवडून आला. यावेळी भाजपातर्फे प्रथमच दक्षिण गोव्यातून महिला उमेदवाराला तिकीट देण्यात आले. भाजपाच्या उमेदवार पल्लवी धेपे ह्या प्रथमच निवडणूक लढवीत आहेत, तर काँग्रेस पक्षाचे विरियातो फर्नांडिस व आरजीचे रुबर्ट परेरा यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविली होती.
भाजपाने आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून कार्यकर्ते, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक, मडगाव भाजप मंडळाचे गटाध्यक्ष रुपेश महात्मे, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक, कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफासियो डायस, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, तसेच वेळ्ळीचे भाजपाचे नेते सावियो रॉड्रिग्स, उमेदवार पल्लवी धेपे यांच्या प्रचारात भाग घेऊन गाठी भेटी घेण्यात व्यस्त आहेत. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे भाजपाच्या उमेदवारासोबत प्रचार करीत आहेत. तसेच कायदामंत्री व नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा हे भाजपच्या उमेदवारासाठी काम करीत आहेत.
काँग्रेस पक्षाचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांच्या प्रचारात विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, सावियो डिसिल्वा, वेळळीचे आमदार कूझ सिल्वा, बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस, गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रशांत नाईक हे प्रचार कार्यात भाग घेऊन त्यांचा प्रचार करीत आहेत.
आरजीचे उमेदवार रुबर्ट परेरा हे आपल्या कार्यकर्त्यासहीत प्रचार करीत आहेत. आतापर्यंत एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज सादर केलेला नाही. मंगळवारी भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार पल्लवी धेपे आपला उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता सादर करणार आहेत.
भाजप-काँग्रेस थेट लढत शक्य
भाजपाने दोन वेळा दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र, मतांची आघाडी फार मोठी नव्हती. १९९९ मध्ये रमाकांत आंगले १४,४५७ मतांनी जिंकले होते. २०१४ मध्ये अॅड. नरेंद्र सावईकर ३२,३३० मतांनी जिंकले होते. भाजपाला आतापर्यंत दक्षिण गोव्यात दोनच वेळा विजय मिळवता आला. यावेळी एकतर्फी निवडणूक होण्याची शक्यता नाही, तर भाजप व कॉंग्रेस पक्ष यांच्यात सरळ लढत होणार आहे.