पणजी : म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला देऊ नये, यासाठी गोव्यातील संगीतकारांनी रविवारी सकाळी मेरी इमॅक्युलेट चर्चच्या पाय-यावर म्हादई नदीवरील आणि प्रेरणादायी गीते गाऊन संगीतमय विरोध दर्शविला. राज्य सरकार कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्यासाठी तयार झाले आहे.एवढी वर्षे राज्यात म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ नये म्हणून पर्यावरणप्रेमी, समाजकार्यकर्ते तसेच बिगर सरकारी संस्था लढा देत आहेत. पाणी तंटा लवादापुढे म्हादईच्या पाण्याविषयी निकाल लवकरच येणार असताना सरकारकडून वेगवेगळी मते दर्शविली जात आहेत. राजकीय अंगाने सरकार कर्नाटकातील विरोधी पक्षातील नेत्यांना जवळ करून नवा वाद निर्माण करीत आहे. त्यातच सरकारच्या सतत बदलत्या मतांमुळे राज्यात विरोधी पक्षासह सर्वजण रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील संगीतप्रेमींनी म्हादय आमची आवय म्हणून गीते गाऊन सरकारच्या निर्णयाला आज विरोध दर्शविला. यामध्ये राज्यातील प्रख्यात संगीतकार सिद्धनाथ बुयांव, सुदीप दळवी, कॅनडी अल्फान्सो, विल्मेक्स आणि शेरॉन यांनी सहभाग घेतला.मेरी इमॅक्युलेट चर्चच्या पाय-यावर उभे राहून या संगीतकारांनी वाद्य वाजवीत गायन केले. सिद्धनाथ बुयांव यांनी खळखळून व्हावता म्हादयं, गोयंकारा श्वास रे म्हादय, मांडवीचे प्राण रे म्हादय, अस्तित्व तिचें गोंयकारा जागय ! हे म्हादई नदीवरील गीत सादर केले. इतर गायकांनीही म्हादई नदीवरील, तसेच इतर स्फूर्ती गीतांचे गायन केले.या आंदोलनातून म्हादई वाचवा हा संदेश देण्याचा संगीतप्रेमींचा प्रयत्न होता. मनोहर पर्रीकर यांनी विरोध करणा-यांना पाठिंबा देणारे हे नुकतेच कलाकार म्हटले होते, त्या विधानावर यावेळी बुयांव यांनी टीका केली. पर्रीकर यांनी संसार हे व्यासपीठआहे, हे समजून घ्यावे. आपण एक कलाकार आहोत, तुम्ही खलनायक बनू नये, असा सल्लाही बुयांव यांनी यावेळी दिला.
म्हादई वाचविण्यासाठी संगीतप्रेमींची साद, सरकारच्या निर्णयाला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 11:00 PM