पणजी: खा, प्या व मजा करण्याचा संदेश देत जरी कार्निव्हलचा किंग मोमो देत असला तरी यंदाच्या कार्निव्हलमध्ये जलसंवर्धन, पर्यावरण रक्षण, वन्यजीव रक्षण व नशाबाजी न करण्याचा संदेश देणारे चित्ररथ पाहायला मिळाल्यामुळे पणजीतील कार्निव्हल एक प्रकारचा भावनिक स्पर्श करून गेला. लोकांच्या उत्साही गर्दीने कार्निव्हल साजरा करण्यात आला. मिरामार दोनापावला रस्त्यावर संध्याकाळी चार वाजता सुरू झालेली कार्निव्हलची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालली होती. राज्यातील विविध ठिकाणाहून आलेले चित्ररथ हे जितके लक्षवेधून घेणारे होते तितकेच चांगला संदेश देणारे होते. किंक मोमो बनलेले विलिएम्स एनेस यांनी रितीरिवाजानुसार खा प्या व मजा करण्याचा संदेश दिला असला, तरी दारू पिऊ नका असा संदेश देणारे चित्ररथ कार्निव्हल मिरवणूकीत होते. शिवाय नशेत वाहने चालवू नका असे सांगणारेही चित्ररथ होते. पाणी हे जीवन आहे. पाण्याचे संवर्धन करणे किती महत्त्वाचे आहे याचे कलेतून महत्त्व पटवून देणारा चित्ररथही लोकांचे लक्ष वेधून घेत होता. त्याच धर्तीवर बनविण्यात आलेला वन्य जीवांचे रक्षण करण्याचा संदेश देणाराही चित्ररथ होता. ‘संगीतकार’ ही वेगळीच कलाकृती साकारताना एक फार मोठा ढोल व त्यामागे सर्व प्रकारची वाद्ये वाजविणारे कलाकार अशी संकल्पना वेगळ्या पद्धतीने साकारलेला चित्ररथ मिरवणुकीत सामील करण्यात आला होता. पर्यावरण, प्लॅस्टीक प्रदूषण, स्वच्छ भारत या सारखे संदेश देणारे चित्ररथही होते.
केरळ पूरग्रस्तांची कृतज्ञताकाही महिन्यांपूर्वी केरळात आलेल्या महापुराने हाहाकार माजविला होता. केरळातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून जसा मदतीचा ओघ सुरू होता तसा गोव्यातूनही सुरू होता. गोव्याने संकटकाळात केलेल्या या मदतीचे स्मरण ठेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केरळाहून आलेले एक पथक या चित्ररथात सामील झाले होते. थँक्स गोवा लिहिलेले फलक व झेंडे घेऊन ते नाचत होते