पणजी: दोनापावला जेटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक भडकले आहेत. आपल्याला मुद्दामहून डावलले जात आहे का? असा प्रश्न त्यानी केला असून मुख्यमंत्री, तसेच मंत्र्यांनी यात लक्ष घालावे, असेही ते म्हणाले आहेत.
दोनापावला जेटीसाठी श्रीपाद नाईक यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून स्वदेश दर्शन योजनेखाली निधी आणला होता. शनिवारी या जेटीचे उद्घाटन करण्यात आले. श्रीपाद नाईक हे गोव्यात असतानाही त्यांना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री किंवा उत्तर गोव्याचे खासदार या नात्याने कार्यक्रमास निमंत्रण दिले नाही. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत श्रीपादभाऊंना विचारले असता ते म्हणाले की, प्रथमच असे घडले आहे असे नव्हे. मुद्दामहून मला डावलले जाते की, चुकीने घडते हे कळत नाही. पुन्हा पुन्हा चूक घडू शकत नाही. दोनापावला जेटीसाठी केंद्रातून मी निधी आणला. मी केंद्रात पर्यटन राज्यमंत्री आहे शिवाय उत्तर गोव्याचा खासदार आहे. या नात्याने मला बोलवायला हवे होते. केंद्राकडून निधी मिळतो तेव्हा केंद्राच्या प्रतिनिधीला कार्यक्रमाला बोलावणे अपेक्षित असते. परंतु ज्या पद्धतीने सर्व काही चालले आहे, ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री यांनी यात लक्ष घालायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.
भाऊंचे कार्यकर्ते संभ्रमात...
श्रीपाद नाईक यांना केवळ सरकारी कार्यक्रमांनाच डावलण्यात येत आहे असे नव्हे, तर पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही दूर ठेवले जात आहे. आगामी वर्ष लोकसभा निवडणुकीचे असतानाही त्यांना का डावलण्यात येत आहे? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी डिचोलीत माजी झेडपी संजय शेट्ये यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही श्रीपादना निमंत्रण नव्हते, अशी माहिती मिळते.
निधीसाठी मी पाठपुरावा केला
मी गोव्यात उपलब्ध असेन किंवा नसेन, तो भाग वेगळा, परंतु केंद्राचा प्रतिनिधी म्हणून व उत्तर गोव्याचा खासदार म्हणून निमंत्रण अपेक्षित आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असे ते म्हणाले. दोनापावला जेटीच्या नूतनीकरणासाठी १७ कोटी रुपये खर्च आला आहे. हा निधी केंद्राने दिला होता. तसेच यासाठी मी स्वतः प्रयत्न केले होते, याची आठवणही श्रीपादभाऊंनी करून दिली.
चेहरा बदलाची चर्चा
आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकिटाचे दावेदार असूनही श्रीपाद यांना या कार्यक्रमाला डावलल्याची चर्चा आहे. यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना तिकीट दिली जाणार का याबाबत संभ्रम आहे. श्रीपादभाऊंना पुन्हा निवडणूक लढवायची आहे. परंतु त्यांना ज्या पद्धतीने त्यांना बाजूला केले जात आहे ते पाहता यावेळी पक्ष उत्तर गोव्यात नवीन चेहरा देण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"