पणजी - गोमेकॉत एमबीबीएस प्रवेशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठीच्या जागांबाबत घोटाळा झालेला आहे, असा आरोप काँग्रेसने केला असून तांत्रिकी शिक्षण खात्याच्या संचालकांनी याबाबत जनतेसाठी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. नियमाप्रमाणे आर्थिक कमकुवत घटकांसाठी १0 जागा असायला हव्या होत्या परंतु वशिलेबाजीने प्रवेश मिळवून देण्यासाठी १५ जागा करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांचा एक नातेवाईकही प्रवेशासाठी स्पर्धेत होता. त्यामुळे त्याची वर्णी लावण्यासाठीच या जागा वाढविल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे संवाद विभागप्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी असा दावा केला की, गोमेकॉत आता १८0 जागा झालेल्या आहेत. ३0 जागा अतिरिक्त मिळाल्या. सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ६८ जागांमध्ये या ३0 जागांची भर पडली त्यामुळे या वर्गासाठीच्या एकूण जागा ९८ झाल्या. नियमाप्रमाणे १0 टक्के म्हणजे ९.८ अर्थात १0 जागा आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी असायला हव्या होत्या. परंतु त्या १५ करण्यात आलेल्या आहे. प्रवेशासाठी अखेरची फेरीही पूर्ण झालेली आहे.
डिमेलो म्हणाले की, ‘नीट’ परीक्षा लागू झाली तेव्हा प्रारंभीच गोमेकॉत एमबीबीएस प्रवेशाच्या बाबतीत घोळ घालण्यात आला होता व त्यावेळी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता कोर्टाने कडक ताशेरे ओढून राज्य सरकारची कानउघाडणी केली होती. परंतु त्यानंतरही सरकार शहाणे झालेले नाही. गोमेकॉमध्ये एमबीबीएसच्या एकूण १५0 जागा होत्या त्यात ३0 जागांची भर पडली. ६0 जागा राखीव कोट्यासाठी आहेत.’
केंद्र सरकारने गेल्या जानेवारीमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी राखीवता जाहीर केली. त्यानंतर गेल्या जूनमध्ये गोवा मंत्रिमंडळाने यासंबंधी अंमलबजावणीचा निर्णय घेतला. त्याआधी गोमेकॉने प्रोस्पेक्टस जाहीर केला त्यानुसार वार्षिक ३ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत होती. नंतर ही मर्यादा वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्न एवढी करण्यात आली. मर्यादा वाढविण्याच्या बाबतीतही वशिलेबाजीचा छुपा हेतू असल्याचा आरोप डिमेलो यांनी केला. सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, असे आवाहन डिमेलो यांनी केले.