- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: 2008 साली अंजुणा किना:यावर मृत्यू आलेल्या स्कार्लेट किलिंग या ब्रिटीश युवतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरवून मुंबई उच्च न्यायालयाने अंजुणाचा बारमन सॅमसन डिसोझा याला दहा वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावल्याने विशेषत: ब्रिटीश माध्यमांकडून समाधान व्यक्त केले जात असले तरी फेलिक्स दहाल या फिनीश व डॅनियली मॅक्लॉग्लीन या आयरीश मुलीच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल समाधानकारक लागेल का असा प्रश्र्नही विचारला जात आहे. ब्रिटीश युवती स्वीनी डॅनिस हिच्या मृत्यू प्रकरणाची केस सीबीआयने बंद केल्यानंतर या दोन निकालाकडे त्यांचे अधिकच लक्ष लागले आहे.
स्कॉर्लेट मृत्यू प्रकरणातील आरोपीला तब्बल 11 वर्षानंतर शिक्षा झाल्यानंतर स्कार्लेटची आई फियोना मॅकइवॉन हिने समाधान व्यक्त केले होते. 11 वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ लढय़ाला यश आल्याचे मत तिने व्यक्त केले होते. या पाश्र्र्वभूमीवर 2015 साली पाटणो - काणकोण येथे मृत पावलेल्या फेलिक्स दहाल या 22 वर्षीय फिनिश युवकाची आई मीना फोर्नोहॅन हिने या निवाडय़ामुळे आमचे समाधान झाले असले तरी त्यामुळे गोव्यातील पोलिसांवरील आमचा विश्र्वास दृढ झालेला नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशाचप्रकारे 2010 मध्ये अंजुणा येथे मृत पावलेल्या स्वीनी डॅनीस या युवतीच्या मृत्यू प्रकरणाची केस सीबीआयने बंद केली होती.
स्कार्लेट किलिंग, स्वीनी डॅनीस व फेलिक्स दहाल या तिन्ही विदेशी पर्यटकांच्या मृत्यू संदर्भात समान धागा म्हणजे, ही तिन्ही प्रकरणो सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती. आणि त्यांचा तपास जवळपास बंदही झाला होता. मात्र या तिन्ही मृतकांच्या घरच्यांनी ही प्रक़रणो लावून धरल्यानंतर ती पुन्हा तपासाला घेतली होती. गोवा पोलिसांना या प्रकरणात यश न आल्याने शेवटी तिन्ही प्रकरणो सीबीआयच्या स्वाधीन केली होती.
यातील स्कार्लेट किलिंग या युवतीचा मृत्यू 18 फेब्रुवारी 2008 रोजी अंजुणा येथे झाला होता. सुरुवातीला गोवा पोलिसांनी तिला बुडून मृत्यू आल्याचे नमुद करुन केस नोंद केली होती. मात्र तिच्या आईने यावर आवाज उठविल्यानंतर पुन्हा शवचिकित्सा करीत सॅमसन डिसोझा व प्लासिदो काव्र्हालो यांच्या विरोधात खुनाचे आरोपपत्र दाखल केले होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने दोघांवरही सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला होता. सप्टेंबर 2016 मध्ये गोवा बाल न्यायालयाने या दोघांनाही निदरेष मुक्त केले होते. मात्र नंतर या निवाडय़ाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
स्वीनी डॅनीस या ब्रिटीश युवतीचा मृत्यू 16 एप्रिल 2010 रोजी अंजुणा येथे झाला होता. हा मृत्यू अंमलीपदार्थाच्या जास्त सेवनामुळे झाल्याचा निष्कर्ष काढून गोवा पोलिसांनी हा मृत्यू अनैसर्गिक म्हणून नोंद केली होती. मात्र स्वीनीच्या दोन बहिणींनी या मृत्यूवरुन अगदी ब्रिटीश संसदही हलवून टाकल्यानंतर 2016 साली हे प्रकरण खुनाचे असे नोंद करीत ते सीबीआयकडे तपासाला दिले होते. मात्र सीबीआयलाही या खुनाचे पुरावे न सापडल्याने शेवटी ते बंद करण्यात आले.
फेलिक्स दहाल या फिनलँडच्या युवकाचा मृत्यू 28 जानेवारी 2015 रोजी पाटणो-काणकोण येथे झाला होता. हेही प्रकरण अंमली पदार्थाचे सेवन करुन तोल जाऊन रस्त्यावर आपटल्याने तो मृत झाला अशी नोंद करीत गोवा पोलिसांनी ही फाईल बंद केली होती. मात्र त्याची आई मीना फिर्नोन हिने आपल्या मुलाचा खून झाल्याचा दावा करीत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा तपासासाठी सीबीआयच्या हाती देण्यात आले होते. या मृत्यूच्या दोन वर्षानंतर हे खून प्रकरण म्हणून नोंद केले होते. सध्या सीबीआय या प्रकरणात तपास करीत आहे.
आयरीश युवती डॅनियली मेक्लॉग्लीन हिचा मार्च 2017 मध्ये राजबाग काणकोण येथे खून झाला होता. या प्रकरणात काणकोण पोलिसांनी विकट भगत याच्या विरोधात खुनाचे आरोपपत्र दाखल केले आहे. सध्या हे प्रकरण दक्षिण गोवा सत्र न्यायालयात चालू असून या निकालाकडेही ब्रिटीश माध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे.