पणजी : राज्यातील अंमली पदार्थाच्या (ड्रग्ज) विषयाबाबत पोलिसांनी सर्व शैक्षणिक संस्थांना पत्रे लिहिली होती. पण, अनेक विद्यालयांनी पत्राला उत्तरच दिले नाही. यापुढे शिक्षण खाते विद्यालयांचे शिक्षक, मुख्याध्यापक आदींना ड्रग्जविषयी अधिक संवेदनशील करण्याचा कार्यक्रम हाती घेतील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
अंमली पदार्थाच्या निर्मितीविषयी काँग्रेसचे नावेलीचे आमदार लुईडिन फालेरो यांनी प्रश्न मांडला होता. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील अंमली पदार्थाचा सुळसुळाट झालेला आहे. विद्यार्थी नव्या पद्धतीच्या ड्रग्जना बळी पडतात, असे फालेरो यांचे म्हणणे होते. काही परिसरांमध्ये ड्रग्जची निर्मितीही होते असल्याचे फालेरो यांनी सांगितले. उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की प्रत्येक विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी गेला आहे, असे कुणीच समजू नये. सगळीकडेच विद्यार्थी ड्रग्ज घेतात असे नाही. तथापि, कुठेही काही घडत असल्यास त्याविषयीची माहिती दिली जावी. कॉलेजचे प्रिन्सीपल, हायस्कुलांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात ड्रग्जविषयक हालचालींविषयी काही माहिती असल्यास ती कळवायला हवी. पोलिसांनी यापूर्वी सर्वच विद्यालयांना पत्रे लिहिली. अनेकांनी पत्राला उत्तर दिले नाही. यापुढे शिक्षण खाते शिक्षकांमध्ये जागृती करील. विद्यार्थ्यांच्या वर्तनावरुन तो ड्रग्जच्या आहारी गेला आहे की नाही हे कळून येत असते.
केटामिनविषयी डीआरआयला पत्र दरम्यान, सत्तरीत सापडलेल्या केटामिनच्या साठ्याविषयी केंद्र सकारची डायरेक्टोरेट रेव्हीन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) ही संस्था चौकशी करत आहे. गोवा सरकारने डीआरआयला पत्र लिहिले होते, पण उत्तर काही आले नाही. गोवा सरकार त्याप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी करू शकत नाही, कारण केटामिन ड्रग्जचा विषय हा विविध राज्यांशी संबंधित आहे. डीआरआयने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. गोव्यातही छापा टाकला. आंतरराष्ट्रीय रॅकेटशी केटामिन प्रकरणाचा संबंध आहे. गोवा सरकारची यंत्रणा तपास करू शकत नाही, अशा बहुराज्यीय व आंतरराष्ट्रीय रॅकेट प्रकरणी तपास डीआरआय संस्थाच करू शकते, असे मुख्यमंत्र्यांनी फालेरो यांच्या व प्रतापसिंग राणो यांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.