पणजी : राज्यात कोविड फैलावाच्या पार्श्वभूमीवर शाळांचे प्रत्यक्ष वर्ग २६ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला असून रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची बैठक आज दुपारी झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही राज्यातील कोविड फैलावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. कडक निर्बंध लागू करण्याची मागणी मंत्र्यांनी केली.
शेजारील राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे वाढते रुग्ण तसेच गोव्यात कोविड फैलाव झाल्याने कडक उपाययोजना आवश्यक होत्या. तज्ज्ञ समितीने रात्रीची संचारबंदी तसेच इयत्ता बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग बंद करण्याची शिफारस कृती दलाकडे केली होती. आज दुपारी कृती दलाची बैठक झाली. कोविड चाचण्यांच्या तुलनेत बाधित सापडण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. पॉझिटिव्हिटी दर १०.७ टक्क्यांवर पोचला आहे ही मोठी चिंतेची बाब आहे.
कृती दलाचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवी व नववीचे वर्ग उद्या मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय झाला आहे. अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी उपस्थित राहावे लागेल. विद्यालयात लस घेतल्यानंतर त्यांनीही २६ पर्यंत वर्ग बंद असल्याने विद्यालयात येऊ नये.
दरम्यान, रात्रीच्या संचारबंदीचा आदेश आज सोमवारी किंवा उद्या मंगळवारी जारी होईल, असे डॉ. साळकर म्हणाले. रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू असेल. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा वर गेल्यास निर्बंध लागू करणे अनिवार्य ठरते त्या अनुषंगाने हे पाऊल उचलावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले. विवाह समारंभ, पार्ट्या आदी सभागृहांमध्ये होणारे कार्यक्रम तसेच थिएटर, मॉलमध्येही निर्बंध लागू होतील.