लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : धुळेर-म्हापसा येथील सेंट अँथनी हायस्कूलमध्ये अज्ञातांनी शिरून तेथील सामानाची मोडतोड करण्यासह पेपर जाळण्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. संशयितांनी नासधूस करताना सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळवून नेला.
घडलेले कृत्य हायस्कूलाप्रती असलेल्या रागातून आजी-माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्याचा संशय प्रथमदर्शनी पोलिसांकडून तसेच शाळेच्या व्यवस्थापनाकडून वर्तवण्यात आला आहे. संशयित हे चुकीच्या मार्गाने गेलेले अल्पवयीन असण्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.
काल, शनिवारी सकाळी हायस्कूलचा शिपाई हायस्कूलमध्ये आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्याची माहिती हायस्कूलच्या व्यवस्थापकाला देण्यात आली. व्यवस्थापक शाळेत दाखल झाल्यावर घडलेला इतरही प्रकार समोर आला. या प्रकारातून एकंदरीत हायस्कूलाच्या मालमत्तेचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संशयितांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलून तोडून आता प्रवेश केला. आतील विजेचे दिवे विजवले. तसेच इतरही दरवाजांचे कुलूप तोडून टाकण्यात आले होते. त्यानंतर हायस्कूलच्या कार्यालयातील व्यवस्थापक, मुख्याध्यापकाच्या कार्यालयातील सामानाची तसेच कपाट तोडून नासधूस केली. कार्यालयातील आरसा तोडून टाकण्यात आला. परिक्षेच्या प्रश्नपत्रिका फाडून टाकण्यात आल्या. त्यानंतर शिक्षकांच्या खोलीत जाऊन तिथेही नासधूस केली आहे.
एकंदरीत तीनही कार्यालयाची नासधूस केल्यानंतर सीसीटीव्हीचा डीव्हीआर तोडून चोरून नेण्यात आला. मात्र हे सर्व कृत्य करताना तिथे असलेल्या इतर सामानाला मात्र संशयितांकडून हात लावण्यात आला नाही. डीव्हीआर पळून नेण्यामागे विद्यार्थ्यांचा हात असावा असाही संशय व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला.
संशयितांनी जाताना डीव्हीआर आपल्यासोबत नेल्याने तपास कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे हायस्कूलाला लागून असलेल्या इतर परिसरातील सीसीटीव्हीची मदत पोलिसांकडून घेण्यात आली आहे. दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी नंतर भारतीय न्याय संहितेच्या ३२९ (४) व ३२४ (५) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
फॉरेन्सिक पथक, ठसेतज्ज्ञांकडून पाहणी
व्यवस्थापक जॉन मान्यूअल परेरा यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली, पोलीस निरीक्षक निखील पालयेकर हे फॉरेन्सीक पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकासह दाखल झाले. घडलेल्या या प्रकारा मागचा उद्देश स्पष्ट होवू शकला नसल्याचे परेरा यांनी माहिती देऊन सांगितले.
पोलिसांच्या हाती पुरावा
घडलेल्या प्रकारातील संशयितासंबंधी काही ठोस माहिती हाती लागल्याचे उपअधीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले. त्यातील काही अल्पवयीन असल्याची शक्यता आहे. त्यांना ताब्यात घेतले जाईल, असे चोडणकर यांनी सांगितले. हायस्कूलमध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे पालक अब्दुल रहीम यांनी सांगितले. तसेच असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून रात्रीच्यावेळी गस्त घालण्याची गरजही त्यांनी व्यक्त्त केली.