हरमल : हरमल-मांद्रे सीमेवरील नारोबा देवस्थानानजीक स्कूटरस्वार रस्त्याच्या मधोमध पडल्याने डोक्यातून रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाला. त्याला बसने ठोकरल्याचा संशय व्यक्त होत असून स्कूटरची हानी झाली आहे. पेडणे पोलीस निरीक्षक दळवी अधिक तपास करीत आहेत. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बांबोळीला पाठविण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हरमल-खालचावाडा येथील रहिवासी तथा नदीपरिवहन खात्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर खोर्जुवेकर (५०) हे ड्युटीसाठी बेतीला जात होते. जुनसवाडा येथील नारोबा देवस्थानानजीक झालेल्या अपघातात खोर्जुवेकर जागीच गतप्राण झाले. त्यांच्या डोक्याला पाठीमागून बराच मार लागला होता. डोक्यावरील हेल्मेट सुरक्षित होते. शिवाय चष्मासुद्धा व्यवस्थित होता. रस्त्याच्या मधोमध पडल्याने बराच रक्तस्राव झाला. त्यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूस उभी करून ठेवण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार, त्यांना बसने ठोकर दिली होती व त्यात ते जागीच मृत्युमुखी पडले. कुणीतरी स्कूटर उभी करून ठेवली असावी व रस्ता मोकळा करून निघून गेले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तेथील एक रिसॉर्ट व अन्य एका नागरिकाच्या घरी पाहिले असता, त्याचवेळेस एक बस हरमलमधून केरीच्या दिशेने गेल्याचे आढळले; परंतु त्याच बसने ठोकरल्याचा पुरावा नाही, असे पोलीस निरीक्षक दळवी यांनी सांगितले. शिवाय दुचाकी सुस्थितीत असल्याने अपघाताबाबत पेच निर्माण झाला आहे. फुटेजच्या आधारे बसचा शोध घेण्यासाठी पोलीस उशिरा केरीत गेले होते. हरमल आउट पोस्टचे हवालदार कांबळी यांनी पंचनामा केला. पेडणे पोलीस निरीक्षक दळवी अधिक तपास करीत आहेत. ज्ञानेश्वर हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, एक कन्या, भाऊ, भावजय असा परिवार आहे. नारायण देवस्थानचे ते माजी पदाधिकारी होते. (प्रतिनिधी)
हरमल येथे स्कूटरस्वार ठार
By admin | Published: September 17, 2016 2:14 AM