लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :काँग्रेसच्या लोकसभा निवडणूक उमेदवार निवड छाननी समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. उमेदवारांची नावे योग्यवेळी जाहीर केली जाणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. छाननी समितीचे अध्यक्ष मिस्त्री यांनी पणजीत काँग्रेस हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे हेही मिस्त्री यांच्याबरोबर उपस्थित होते. तेही उमेदवार छाननी समितीचे सदस्य आहेत. दक्षिण आणि उत्तर गोव्यासाठी इच्छुक अशा सर्वच उमेदवारांशी त्यांनी व्यक्तिशः बैठक करून चर्चा व चौकशी केली. यात दक्षिणेसाठी गिरीश चोडणकर आणि खासदार फ्रासिन्स सार्दिन तर उत्तर गोव्यासाठी रमाकांत खलप आणि विजय भिके यांच्याशी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. चर्चा रात्री ९ वा. पर्यंत चालली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी कडक आग्रह धरला होता. निवडणूक जिंकण्याची क्षमता हा निकष, उमेदवारीसाठी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काँग्रेस गोव्यात दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जाहीर केले आहे. दोन्ही जागांवर काँग्रेसच जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.