पणजी : पावसाळी पर्यटनाचे ढोल गोवा सरकारच्या काही यंत्रणा जोरात वाजवत असल्या तरी, प्रत्यक्षात पावसाळ्यात गोव्यातील समुद्रकिनारे अधिक धोकादायक बनलेले आहेत. याची कोणतीही कल्पना नसलेले देश-परदेशातील पर्यटक समुद्रात स्वत:ला झोकून देतात आणि जीव गमावून बसत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत अशा प्रकारे सात पर्यटकांना जलसमाधी मिळाली आहे तर काहीजण बुडताना वाचले आहेत. गोव्यात पावसाळी पर्यटन अजून पूर्णपणे विकसित झालेले नाही. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य खुललेले असते. गोव्याचा पाऊस हा पर्यटकांना हवाहवासा वाटतो. ढगफुटी झाल्यासारखा पाऊस गोव्यात पडत नाही. किंवा अखंडितपणेही पाऊस बरसत नाही.
पाऊस मध्येच गायब होतो व लख्ख ऊन पडतं. पर्यटकांना असे वातावरण आवडते. मात्र गोव्यातील समुद्र हा पावसात अधिक खवळलेला असतो. गोव्याला 105 किलोमीटर लांबीचा सागरकिनारा आहे, त्यापैकी 70 टक्के किनारपट्टी ही पावसाळ्य़ात पोहण्यासाठी पूर्णपणे धोकादायक बनलेली असते. काही भागात जीवरक्षकांनी लाल ङोंडे लावलेले आहेत. लाव ङोंडे लावलेल्या ठिकाणी पोहायला जायचे नसते, हे पर्यटक लक्षात घेत नाहीत.
काही ठिकाणी तर लाल बावटेही लावलेले नाहीत. शिवाय जीवरक्षक काही पूर्ण 105 किलोमीटरच्या किना-यावर उभे नसतात. ते ठराविक जागांवर असतात. दृष्टी संस्थेकडे किना-यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने दिलेली आहे. सुमारे एक हजार जीवरक्षकांना प्रशिक्षण देण्याचा संकल्प नुकताच गोवा पर्यटन विकास महामंडळाने सोडलेला आहे. मात्र सध्या गोव्यातील समुद्र पर्यटकांचा जीव घेऊ लागला आहे व सरकारी यंत्रणा त्याविरुद्ध मोठय़ा व प्रभावी उपाययोजना करण्यात कमी पडत आहेत.
पर्यटन मंत्री बाबू आजगावकर तसेच पर्यटन महामंडळाचे चेअरमन निलेश काब्राल म्हणाले,की पावसाळ्य़ात एखाद्या ठिकाणी पोहायला जाऊ नका असे सांगितले तरी काहीवेळा पर्यटक ऐकत नाहीत. काहीवेळा रात्री तर काहीवेळा अगदी पहाटे पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात उतरतात व बुडतात. सरकार पावसाळ्य़ात समुद्राकडे जाऊच नका असा नकारात्मक प्रचार करू शकत नाही पण पावसाळ्य़ात समुद्रात उतरण्यास पूर्ण बंदी लागू करता येईल काय याची शक्यता कायद्याच्या चौकटीत राहून सरकार सध्या पडताळून पाहत आहे.
गेल्या पंधरा दिवसांत सात पर्यटक गोव्यात बुडाले. त्यापैकी पाच पर्यटक हे महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत. तामिळनाडू येथील पर्यटक सिकेरीच्या पट्टय़ात खडकावर बसलेला असताना सागराच्या लाटेने त्याला आत ओढून नेले. पावसाळ्य़ात समुद्राच्या एवढ्या जवळ बसणेही घातक आहे हे पर्यटकांना कुणी सांगितलेच नाही. बागा येथेही एक पर्यटक बुडाला.