पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे पण पर्रीकर यांचा आजार गंभीर असल्याने भाजपमधून व सत्ताधारी आघाडीतूनही पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झालेला आहे. गोव्याचे प्रशासन सक्रिय होण्यासाठी नव्या मुख्यमंत्र्यांची तातडीने गरज आहे याची कल्पना गोवा फॉरवर्ड व मगोप या घटक पक्षांनाही आलेली आहे. सरकारमधील तीन मंत्री येत्या 17 किंवा 18 रोजी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटून राजकीय स्थिती त्यांच्यासमोर ठेवणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दोनापावला येथील आपल्या निवासस्थानी आहेत. तिथे चोवीस तास ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सरकारमधील घटक पक्ष सध्या पर्यायी मुख्यमंत्री कोण याविषयी चर्चा करू लागले आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपचे आमदार असलेले आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे पुढे आहेत. मात्र मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची त्यांना अजून मान्यता लाभलेली नाही. गोवा फॉरवर्डचे नेते असलेले मंत्री विजय सरदेसाई यांचा तूर्त तरी मंत्री राणे यांना पाठींबा असल्याची माहिती मिळते. भाजपच्या सर्व आमदारांची सोमवारी पक्षाच्या पणजीतील मुख्यालयात बैठक झाली. त्यावेळीही राज्यातील राजकीय स्थितीविषयी चर्चा झाली.
पर्रिकर हे दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेत होते. तिथे त्यांनी उपचार पूर्ण केले नाहीत. रविवारी पर्रीकर गोव्यात दाखल झाले. रविवारी त्यांची प्रकृती नाजूक बनली होती. त्यामुळे भाजपच्या सर्व आमदार व मंत्र्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पर्रीकर हे गोव्यात आल्यानंतर कुठल्याच मंत्री किंवा आमदाराला भेटू शकलेले नाहीत. पर्रीकर हे दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांसोबत आहेत.
त्यांच्या निवासस्थानीही भाजपमधील कुणीच मंत्री किंवा आमदार जाऊ शकले नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे हे दोघे मात्र सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती थोडी सुधारली असल्याचे त्यांना दिसून आले. तथापि, पर्रिकर यांच्या निवासस्थानी कायम सरकारी डॉक्टर्स ठेवण्यात आले आहेत. 1०8 रुग्णवाहिकाही त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवली गेली आहे.
दरम्यान, विद्यमान विधानसभेत काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने त्या पक्षाचे दोन आमदार फोडावेत असा प्रयत्न भाजपमधून सुरू झालेला आहे. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे या दोघा आमदारांना भाजपने गळ टाकलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला निवेदन सादर केले असून, काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी न देता गोवा विधानसभा विसर्जित केली जाऊ नये अशी मागणी काँग्रेसने निवेदनातून केली आहे.