पणजी : राज्यात कोविड आता खूपच नियंत्रणात असला तरी, गाफील राहून चालणार नाही. कारण कोविडची दुसरी लाट येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात गोव्यात येऊ शकते, असा इशारा आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे दिला.
राज्यात सध्या दिवसाला फक्त दोनशे किंवा सव्वा दोनशे कोविड बाधित आढळतात. रोज सरासरी १७०० कोविड चाचण्या होतात. कोविड मृत्यूंची संख्याही ओक्टोबरमध्ये कमी झाली. सप्टेंबरच्या तुलनेत ओक्टोबरमध्ये कोविडमुळे कमी रुग्ण दगावले. लोकांमध्ये पुन्हा शिथिलता येऊ लागली आहे.या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री राणे म्हणाले, की दिल्लीत देखील कोविड नियंत्रणात आला होता पण आता नव्याने तिथे मोठ्या संख्येने रुग्ण आढळणे सुरू झाले आहे. युरोपमध्येही कोविडची दुसरी लाट सुरू झाली. गोव्यात देखील नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दुसरी लाट येऊ शकते. त्यामुळेच आम्ही कोविडविषयक कोणत्याच सुविधा बंद करणार नाही. त्या सुरूच ठेवणार आहोत.
राणे म्हणाले, की लोकांनी काळजी घ्यायलाच हवी. त्या शिवाय पर्याय नाही. यापुढे मोठ्या प्रमाणात राज्यात आर्थिक उपक्रम सुरू होतील किंवा सगळे व्यवसाय सुरू होतील तेव्हा कोविड रुग्ण संख्या वाढू शकते. चाचण्या वाढविण्याची सूचना आपण यापूर्वीच आरोग्य खात्याच्या अधिकाऱ््यांना केली व त्यांनी चाचण्या वाढवल्या आहेत.
राणे म्हणाले, की कोविड नियंत्रणात आल्याने आता फोंडा येथील कोविड इस्पितळाची गरज नाही असा सल्ला मला काही अधिकारी देतात. मात्र मला ते मान्य नाही. फोंडासह सर्व रही कोविड इस्पितळे सुरू राहतील. फोंड्याचे इस्पितळ आम्ही कोविडमध्ये रुपांतरित केले आहे, ते तसेच राहिल. मला अधिकाऱ््यांनी सांगण्याची गरज नाही. मी काही अशिक्षित मंत्री नव्हे.आणखी दोघांचा मृत्यू दरम्यान, कोविडमुळे शनिवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची एकूण संख्या ६०४ झाली आहे. शनिवारचे दोन्ही मृत्यू बांबोळीच्या गोमेको इस्पितळात झाले. फोंडा येथील ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू शस्त्रक्रिया विभागातच झाला, कारण तिला दुसरा एक गंभीर आजार झाला होता. योगायोगाने तिला कोविडचीही लागण झाली, असे गोमेकोच्या डीनचे म्हणणे आहे. दोडामार्ग येथील ७५ वर्षीय कोविड रुग्णाचे गोमेकोत निधन झाले.