पणजी : निवृत्त न्यायमूर्ती पी. के. मिश्र हे लोकायुक्त म्हणून निवृत्त झाले व त्याबरोबर सरकारने संधी साधत सोमवारी त्यांची सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे.लोकायुक्तांना दोन अंगरक्षक सरकारकडून दिले गेले होते. लोकायुक्त जेव्हा कार्यालयात किंवा अन्यत्र कुठे जातात तेव्हा वाहनात त्यांच्यासोबत हे दोघे अंगरक्षक म्हणजे दोघे पोलिस असायचे. त्यांना सरकारने माघारी बोलावले आहे. त्यामुळे ते गेले. तसेच चौघे पोलिस मिश्र यांच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी असायचे. हे चौघेही एकाचवेळी उपस्थित नसायचे. त्यांना आलटून पालटून निवासस्थानी सुरक्षेच्या डय़ुटीवर पाठवले जात होते. त्या चौघांनाही गृह खात्याने परत बोलावल्याने तेही गेले. मिश्र हे आल्तिनो येथे सरकारी निवासस्थानी राहतात. त्यांच्या सेवेसाठी वाहन असले तरी, त्यांना त्या वाहनाची गरज राहिलेली नाही. कारण कोविडचे संकट वाढत चालल्याने निवृत्तीनंतर निवृत्त लोकायुक्तांनी पूर्णपणो घरीच राहणो पसंत केले आहे. मिश्र हे 73 वर्षीय असल्याने त्यांनी आता घरी देखील कुणाला भेटणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांना वाहनाची गरज राहिलेली नाही. निवृत्तीनंतर एक महिना लोकायुक्त सरकारी निवासस्थानी राहू शकतात. ते यापुढे आपल्या मूळ गावी म्हणजे ओडीशाला निघून जाणार आहेत. लोकायुक्तांनी अलिकडे अनेक महत्त्वाचे निवाडे देत सरकारी गैरव्यवहारांवर कडकपणो बोट ठेवले. सरकारला ते आवडलेले नाही व त्यामुळे सरकारने सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची घाई केली अशी चर्चा सचिवालयातही सुरू आहे. मिश्र हे जेव्हा मानवी हक्क आयोगाचे चेअरमन म्हणून निवृत्त झाले होते तेव्हा निवृत्तीनंतरही तीन आठवडे सरकारने मिश्र यांची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली होती.
गोव्याच्या निवृत्त लोकायुक्तांची सुरक्षा काढून घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 8:24 PM