पणजी : ५४ व्या इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा नॉन फीचर विभागात सुयश कामत दिग्दर्शित ‘सदाबहार’ कोकणी शॉर्ट फिल्मची निवड झाली आहे. इंडियन पॅनोरमा फिचर फिल्म विभागात ‘अट्टम्’ हा मल्याळम् चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट असेल तर नॉन फिचर फिल्म विभागात ‘ॲंड्रो ड्रीम्स’हा मणिपूरी चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. इफ्फीत इंडियन पॅनोरमा विभागात प्रदर्शित केल्या जाणार असलेल्या २० नॉन फिचर व २५ फीचर चित्रपटांची यादी काल जाहीर करण्यात आली. २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार असलेल्या इफ्फीत हे चित्रपट प्रदर्शित केले जातील.
इफ्फीत इंडियन पॅनोरमा विभाग १९७८ साली सुरु करण्यात आला. भारताची समृध्द संस्कृती व वारसा चित्रपट कलेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचावा तसेच भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा विभाग त्यावेळी सुरु करण्यात आला. ‘सदाबहार’ हा १३ मिनिटांचा लघू चित्रपट असून बॅण्ड पथकातील पाच तरुणांच्या जीवनावर आधारित आहे. संगिताने माणूस जोडला जातो. संगिताला भाषेचे बंधन नसते हे या लघूपटातून दाखवले आहे. १ नोव्हेंबर २०२२ रोजी नेटफ्लीक्स इंडियन यु ट्युबवर तो रिलीज करण्यात आला होता.