लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपने आतापर्यंत दर्जेदार साधनसुविधेबरोबर राज्याला चांगले प्रशासन दिले. 'आत्मनिर्भर भारत'च्या पार्श्वभूमीवर स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांर्तगत प्रशासन तुमच्या दारी, मंत्री तुमच्या दारी, सरकार तुमच्या दारी असे विविध उपक्रम राबवले. एकंदरीत लोकांच्या हिताचे सरकार आम्ही चालवत आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पर्वरी विधानसभेतील सभागृहात मंगळवारी भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणाऱ्या माहिती पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. सरकारने स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत लोकांना राहण्यासाठी घरे, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षितता प्रदान केली. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक साधनसुविधा तयार केली. अशा आमच्या उपक्रम व योजनांमधून आम्ही ९८ टक्के लोकांपर्यंत साधनसुविधा पोहोचविल्या आहेत. यामध्ये मला प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याचा हातभार लागला आहे. तसेच मंत्री आणि आमदारांमुळे अनेक कामे जलदगतीने मार्गी लागली आहेत, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
वाहतूक, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, शेती, क्रीडा, समाज कल्याण, साधनसुविधा, विकास, अशा कोणत्याच क्षेत्रात आम्ही मागे नाही. प्रत्येक क्षेत्र आमच्या सरकारच्या कारकिर्दीत बहरले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आणि केंद्र सरकारची मदत आम्हाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोमंतकीयांनी तसेच मंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे आज गोव्याचा चौफेर विकास होताना दिसत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले....
- खाणींप्रमाणे म्हादईचा विषय देखील मार्गी लावणार.
- मन की बात धर्तीवर आता गोवा की बात कार्यक्रमाला सुरुवात.
- पिंक, टुरिस्ट फोर्स आणून कायदा व सुव्यवस्थेला बळकटी.
- क्रीडा, आध्यात्मिक, वेलनेस, ग्रामीण पर्यटक वाढीवर भर दिला.
- मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमान- तळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण.
- विमानतळ प्रकल्पात १५०० नव्या नोकऱ्या दिल्या. यात १२०० नोकऱ्या फक्त पेडणेवासीयांना दिल्या.
- आयुष हॉस्पिटलचे लोकार्पण, इतर आरोग्य सुविधा उभारल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"