लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सेल्फ हेल्प ग्रुपच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी सरकारने व्यासपीठ उपलब्ध केले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल स्वयंपूर्ण इ बाजार पोर्टलचे अनावरण करण्यात आले.
चतुर्थी काळात इ बाजार माध्यमातून लोकांनी खरेदी केली होती. त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता पोर्टल सुरु करण्यात आले आहे. राज्यातील सेल्ल हेल्प गटांच्या ४६ हजार महिला तसेच सुमारे १२ हजार कारागिरांना याचा लाभ होणार आहे. आतापर्यंत ५२ सेल्फ हेल्प गटांनी नोंदणी केलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
सेल्फ हेल्प गटांमधील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी एफडीए तसेच अन्य यंत्रणांचे परवाने कसे घ्यावे, ऑनलाइन विक्री कशी करावी याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी काही खरेदीच्या ऑर्डरही देण्यात आल्या.
दरम्यान, प्रशासनातील अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी तसेच तमाम जनतेला अर्थसंकल्प सोप्या पध्दतीने समजावा, राज्य सरकारचा खर्च, कर्जे, कर याचे योग्य आकलन व्हावे यासाठी 'मॅन्युअल'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी अधिकारी उपस्थित होते.