पणजी : गोवा विधानसभेच्या निवडणुका यापुढील बावीस महिन्यांत होणार आहे. त्यामुळे सध्या होत असलेली जिल्हा पंचायत निवडणूक ही विधानसभेची सेमी फायनलच बनली आहे. सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना या जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी होत आहे. गोव्यात जिल्हा पंचायतींचे एकूण चाळीस मतदारसंघ आहेत. सरासरी बावीस हजार मतदारांचा एक मतदारसंघ आहे. निवडणुकीसाठी गोवा राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज स्वीकारणो गुरुवारपासून सुरू केले. भाजपकडून जिल्हा पंचायतीच्या सुमारे पंचेचाळीस जागा तर काँग्रेसकडून चाळीस जागा लढविल्या जाणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुका गोव्यात दुस:यांदा पक्ष पातळीवर होत आहेत. पक्षाच्या निशाणीवर उमेदवार उभे राहतील.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या मते सीएए, म्हादई पाणी तंटा, बंद असलेला खाण धंदा या विषयांवरून गोवा सरकारविरुद्ध लोकांत चिड आहे. या संतापाचे प्रकटीकरण लोक मतदानाद्वारे करतील असे चोडणकर यांना वाटते. विद्यमान भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी मतदारसंघांचे आरक्षण करताना घोळ घातला हा देखील विरोधी काँग्रेसने निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या मते सरकारने मतदारसंघ आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत राहूनच केले आहे. जिल्हा पंचायत निवडणूक व विधानसभेची निवडणूक यावेळी सगळी गणिते वेगळी असतात व त्यामुळे आम्ही जिल्हा पंचायत निवडणूक ही विधानसभेची सेमी फायनल आहे या दृष्टीकोनातून पाहत नाही अशी सावध व सुरक्षित प्रतिक्रिया तानावडे यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने सगळ्य़ा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. उमेदवाराला पाच लाख रुपयांर्पयत खर्च करण्याची मर्यादा आहे. अनेक मंत्री, आमदारांनी आपआपल्या मर्जीतील कार्यकत्र्याना रिंगणात उतरविण्यासाठी खेळी खेळण्यास आरंभ केला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्यात अपेक्षित यश मिळाले नव्हते. यावेळी भाजपकडे सर्वात जास्त म्हणजे सत्तावीस आमदार आहेत तर विरोधी काँग्रेसकडे पाच आमदार आहेत. सर्व विरोधी पक्षांकडून जिल्हा पंचायत निवडणुकीला विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणूनच पाहिले जात आहे.