ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 12 - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रातून गोव्यात परत पाठवावे, अशी मागणी निवडून आलेल्या भाजपा आमदारांनी केली आहे. भाजप विधिमंडळाची बैठक आज झाली त्यात पक्षाच्या तेराही आमदारांनी भाग घेतला. पर्रीकर यांच्याकडेच नेतृत्त्व सोपविले जावे, या मागणीने जोर धरला आहे. गोव्यात सरकार स्थापनेसाठी भाजपने हालचाली गतिमान केल्या आहेत. तर दुसरीकडे पर्रीकर हे मुख्यमंत्रीपदी येत असतील तर भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची तयारी मगोपने दर्शविली आहे. तसा ठराव मगोप विधिमंडळ बैठकीत घेण्यात आला. भाजपाचे दक्षिण गोव्याचे खासदार तथा प्रवक्ते नरेंद्र सावईकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना नेता निवड लवकरात लवकर करावी, अशा आशयाचा ठराव बैठकीत संमत करून केंद्रीय नेत्यांना पाठवला असल्याचे सांगितले. गोव्याचा विकास, स्थैर्य यासाठी मगोप, गोवा फॉरवर्ड तसेच अपक्षांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्रीकर गोव्यात आल्यास एखाद्या आमदाराने त्यांच्यासाठी जागा रिकामी करण्याची तयारी दाखवली आहे का, असा सवाल केला असता हा काल्पनिक प्रश्न असल्याचे नमूद करून त्यावर भाष्य करणे सावईकर यांनी टाळले. गोव्यातील नेता निवड केंद्रीय नेत्यांकडूनच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्रिकरच मुख्यमंत्री हवेत : आमदार मायकल लोबोपर्रीकर यांना गोव्यात विधिमंडळ नेता म्हणून पाठवावा, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आलेली आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी स्पष्ट केले. सरकार स्थापनेसाठी मगोप व गोवा फॉरवर्डबरोबर चर्चा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. पर्रिकर यांना केंद्रात नेले तेव्हा पणजीत रिकामी झालेल्या जागेवर सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांनी पोटनिवडणूक लढवून ते विजयी झाले होते. त्यानंतर आताही कुंकळ्येंकर पुन: निवडून आले आहेत. पर्रीकर गोव्यात आल्यास त्यांच्यासाठी आमदारकी सोडणार काय, असा प्रश्न केला असता पक्ष काय आदेश देईल तो शिरसावंद्य असल्याचे ते म्हणाले. हळदोणेचे आमदार ग्लेन तिकलो, साखळीचे आमदार प्रमोद सावंत तसेच इतर भाजपा आमदारांचीही पर्रीकर यांच्याकडेच नेतृत्त्व सोपविले जावे, अशी भावना आहे. मगोपलाही पर्रीकर मुख्यमंत्री मान्य - सुदिन ढवळीकरदरम्यान, एवढे दिवस मुख्यमंत्रिपदासाठी शर्यतीत असलेले आणि मगोपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलेले माजी बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांना मगोपच्या पिछेहाटीमुळे नमते घ्यावे लागले असून, तीन आमदार गाठीशी असलेल्या मगोपनेही मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी येत असतील तर भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. तसा ठराव मगोप विधिमंडळ गटाने घेतल्याच्या वृत्तास पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला.
पर्रीकरांना परत पाठवा, गोव्यात भाजप आमदारांची मागणी
By admin | Published: March 12, 2017 2:32 PM