वास्को: दक्षिण गोव्यात असलेल्या कुठ्ठाळी ग्रामपंचायतीची रिक्त असलेली सरपंच तथा उपसरपंचाची जागा भरून काढण्यासाठी गुरूवारी बोलवण्यात आलेल्या बैठकीत सेनिया परेरा यांची सरपंच तर सांतान गामा यांची उपसरपंच पदावर निवड झाली. सेनिया परेरा यांच्या विरुद्ध अनिता केंकरे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने निवडणूक घेतली असता सेनिया यांना ६ तर अनिता यांना ४ मते मिळाली. सांतान गामा विरुद्ध रेमंड डी’सा यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने निवडणूक घेतली असता सांतान यांना ६ तर रेमंड यांना ५ मते मिळाली. सेनिया परेरा यांना कुठ्ठाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच बनण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे.
४ नोव्हेंबर रोजी कुठ्ठाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच आंजेला फुर्तादो व उपसरपंच रेमंड डी’सा यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर ह्या पदाच्या दोन्ही खुर्ची रिक्त झाल्या होत्या. कुठ्ठाळी पंचायतीचा नवीन सरपंच व उपसरपंच निवडण्यासाठी गुरूवारी बैठक बोलवण्यात आली. सदर बैठकीला ह्या पंचायतीचे ११ ही पंच सदस्य उपस्थित होते. तसेच मुरगाव गटविकास कार्यालयाचे अभियंता निकलोस कोद्रोस ह्या बैठकीला निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते.
सरपंच पदासाठी सेनिया परेरा तसेच अनिता केंकरे यांचे अर्ज आल्याने पंच सदस्यांच्या मतदानाने सरपंच निवडण्याचे ठरवण्यात आले. यावेळी सेनिया परेरा यांना ६ मते मिळाली तर अनिता केंकरे यांना ४ मते मिळाल्याने सेनिया यांची सरपंच पदावर निवड झाल्याचे निर्वाचन अधिकाऱ्याने घोषीत केले. एक मत अवैद्य ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपसरपंच पदासाठी सांतान गामा व रेमंड डीसा यांचे अर्ज आल्याने मतदान घेतले असता सांतान यांना ६ तर रेमंड यांना ५ मते मिळाल्याने सांतान यांची उपसरपंच पदावर निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. सेनिया परेरा यांना कुठ्ठाळीच्या सरपंच बनण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे.
निवडणूकीनंतर पत्रकारांशी बोलताना कुठ्ठाळी पंचायत क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलण्यात येणार असल्याचे परेरा यांनी याप्रसंगी सांगितले. विकासाचा ध्येय असलेले पंच सदस्य एकत्र आले असून भविष्यात विविध विकासकामांची सुरवात करण्यात येणार असल्याचे परेरा यांनी माहीतीत शेवटी सांगितले. नवनिर्वाचित उपसरपंच सांतान गामा यांनी बोलताना कुठ्ठाळी ग्राम पंचायतीच्या विकासासाठी काम करणार असल्याचे याप्रसंगी सांगितले.