पणजी : सेक्सी दुर्गा या मल्याळम चित्रपटाचे नाव बदलून ‘एस दुर्गा’ असे करूनही हा चित्रपट 2017 मध्ये गोव्यात झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्(इफ्फी) सवात प्रदर्शित करण्यास नकार देण्यात आला होता. त्याविरोधात मोठे वादंग उठले होते. परंतु आता सेन्सॉर बोर्डाच्या फेरआढावा समितीने या चित्रपटाला कोणतीही कात्री न लावता संमती दिली आहे. त्यामुळे इफ्फीच्या आयोजकांना ही मोठी चपराक समजली जात आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक सनल कुमार शशिधरण यांनी सांगितले की, आता हा चित्रपट लोकांना पाहण्यासाठी खुला झाला आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे ‘यू/ए’ प्रमाणपत्र मिळाले असून, या निर्णयामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. शिवाय आता हा चित्रपट प्रदर्शनास अजिबात वेळ घालविला जाणार नाही. या चित्रपटामध्ये काहीही आक्षेपार्ह नसून, आता या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टरही शशिधरण यांनी ट्विटरवर अपोलोड केले आहे.
गोव्यात मागील वर्षी झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरामामध्ये या चित्रपटाची निवड झाली होती. मात्र, आयोजन समितीने त्यास आक्षेप घेतला असल्याने तो चित्रपट दाखविला गेला नाही. त्याविरोधात त्या चित्रपटातील कलाकारांनी महोत्सवकाळात आंदोलनही केले होते. त्याचबरोबर केरळ उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या बाजूने निकाल दिला होता. परंतु महोत्सवाच्या काळात वाद सुरू झाल्याने ज्युरी सदस्यांसाठी या चित्रपटाचे स्क्रिनिंगही करण्यात आले होते. याशिवाय चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सेन्सॉर बोर्डाने पुन्हा एकदा चित्रपट पहावा, असे आदेश दिल्याने चित्रपट महोत्सवात दाखविण्याच्या आशा दिसत होत्या, पण त्या आशा फोल ठरल्या.
या चित्रपटाच्या वादाचा मुद्दा बनलो तो ‘एस’हे अक्षर. कारण ़‘सेक्सी दुर्गा’ असे या चित्रपटाचे पूर्वीचे नाव होते, ते बदलून ‘एस दुर्गा’ असे नाव करण्यात आले, तरीही त्याला आक्षेप घेण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाच्या फेरआढावा समितीच्या आठ सदस्यांनी 23 जानेवारीपूर्वीच या चित्रपटाला कोणतीही कात्री न लावता प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला होता.