मडगाव: गोव्यात खुनांची मालिका सुरुच असून, दहा दिवसांत या छोट्याशा राज्यात पाच खूनाची प्रकरणे घडली. आज शुक्रवारी राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील रुमडामळ हाउसिंग बोर्ड येथे एका साधारण बावीस वर्षीय युवकाचा त्याच्या राहत्या घरात सकाळी निर्घृणपणे खून करण्यात आला. सादीक बेळ्ळारी असे मयताचे नाव असून, झोपलेल्या अवस्थेत असताना त्याच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने सपासप वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात तो निपचित झाला. यानंतर संशयित घटनास्थळाहून फरार झाला. मयत एका खून प्रकरणातील संशयित असून, त्या खुनाचा बदला म्हणूनच त्याचाही काटा काढण्यात आला असल्याचा प्राथमिक कयास आहे. पोलिसही त्या दिशेने तपास करीत आहे. अजूनही पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळालेले नाहीत.
सकाळी सव्वा नऊ ते साडेनउ या दरम्यान खुनाची वरील घटना घडली. सादीक हा आपल्या घरात झोपला होता. त्याला सकाळी उशिरा उठण्याची सवय होती. तो घरातील एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील नेहमी प्रमाणे सकाळी कामासाठी बाहेर गेले हाेते. तर आई नंतर काही कामाच्या निमित्याने बाहेर पडली. जाताना तिने घराचा दरवाजा ओढून घेतला होता. त्यावेळी खुन्याने घरात येउन सादीकवर सपासप वार केले.
खुनाची माहिती मिळाल्यानतंर मायणा कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन तपासकामाला सुरुवात केली. मडगाव विभागाचे पोलिस अधिक्षक संतोष देसाई यांनीही घटनास्थळी जाउन पहाणी केली. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई व अन्य पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
मयताची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. २०२० साली मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खुन प्रकरणात त्याचा सहभाग होता. दवर्ली येथील भगवती कॉलनी येथे खुनाची ही घटना घडली होती. मुहाझीद खान याचा खून झाला होता. या प्रकरणात सादीक व इस्माईल मुल्ला याला नंतर पोलिसांनी अटक केली होती. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन तपासकामाला सुरुवात केली. त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरांचीही मदत पोलिस घेत आहेत.