पणजी : सेसा गोवा-वेदांता कंपनीच्या आठ लिज क्षेत्रांमध्ये नव्याने व्यवसाय सुरू झाला आहे. कोडलीमधील तीन आणि डिचोलीमधील पाच लिज क्षेत्रांचा यात समावेश आहे. सेसाच्या एका खाण क्षेत्रात तीन ते पाच लिज क्षेत्रे येतात. कोडली येथे गेल्या महिन्यात सेसा गोवा कंपनीने खाण व्यवसाय सुरू केला. सोमवारी डिचोलीत सेसाच्या खाणी सुरू झाल्या. डिचोलीतील एक खाण ही पाच लिज क्षेत्रांमध्ये विभागली गेली आहे. यापुढे सुर्ल-साखळी येथे सेसाची मोठी खाण सुरू होणार आहे. अन्य चार ठिकाणी आॅक्टोबरमध्ये खनिज खाणी सुरू होतील; पण ती लिज क्षेत्रे लहान आहेत. सुर्लमधील लिज क्षेत्र हे अन्य क्षेत्रांच्या तुलनेत मोठे आहे. सेसा गोवाचे कॉर्र्पोरेट अफेअर्स उपाध्यक्ष ए. जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तीन वर्षे व्यवसाय बंद राहिल्याने जे अधिकारी व कर्मचारी राजीनामा देऊन सेसा गोवा कंपनीला सोडून गेले किंवा ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती पत्करली, त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार काय, असे या प्रतिनिधीने जोशी यांना विचारले असता ते शक्य नाही, असे ते म्हणाले. कारण, आता उत्पादनावर मर्यादा आली आहे. प्रत्येक लिज क्षेत्रातील उत्खनन मर्यादा ही कमी केली आहे. व्यवसाय मर्यादित असेल, त्यामुळे नवे जास्त मनुष्यबळच लागणार नाही. सध्या जे मनुष्यबळ आहे, ते वापरूनच खाण व्यवसाय केला जाईल. अत्यंत गरजेच्या ठिकाणी नवे अधिकारी नेमले जातील; पण या नव्या मनुष्यबळाचे प्रमाण खूपच कमी असेल, असे जोशी यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
सेसाच्या आठ लिज क्षेत्रांमध्ये नव्याने खाण व्यवसाय सुरू
By admin | Published: September 15, 2015 2:30 AM