पणजी : विधानसभेचे आणखी एक अधिवेशन येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी येथे सांगितले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या दि. २५ पासून सुरू होत असलेले अधिवेशन हे विधानसभेचे शेवटचे अधिवेशन आहे, असे म्हणता येणार नाही. नोव्हेंबरमध्ये आणखी एक आठवडाभराचे अधिवेशन व्हायला हवे, असे माझे मत आहे. राजकीय स्थितीविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांनी महायुती केली, तरी आमची काहीच हरकत नाही. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या युती होत असतात. मात्र, अनेक विरोधी पक्ष किंवा विरोधी आमदार एकत्र आले व त्यांची महायुती झाली म्हणून लोक सरकारविरुद्ध एकत्र येणार नाहीत. विविध पक्ष व त्यांचे आमदार एकत्र येऊ शकतात; पण त्यांचे समर्थक एकत्र कधी येत नाहीत. म्हणजे सरकारविरुद्ध मतांचे एकत्रीकरण झाले असे होत नसते. मुख्यमंत्री म्हणाले की, गेले अनेक दिवस महायुतीबाबत चर्चा सुरू आहे. यापुढील सरकार काँग्रेसचे असेल, असे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी म्हटले आहे खरे; पण कोणत्या राज्यात ते त्यांनी सांगितलेले नाही. त्यांनी राज्याचे नाव घेतले नाही. कदाचित ते ईशान्येकडील राज्यांविषयी बोलत असतील. (खास प्रतिनिधी)
विधानसभेचे नोव्हेंबरमध्ये एक अधिवेशन शक्य
By admin | Published: July 21, 2016 2:21 AM