गोव्यात केवळ एकच पोलिस कॉन्स्टेबल चोरांशी सेटिंग केल्याप्रकरणी पकडला गेला आहे. उत्तर गोव्यात चोरी कर, असे चोराला सांगून त्याच्याशी डील करणारा पोलिस पूर्ण गोव्यात एकटाच आहे, असे मानता येणार नाही. समाजातील प्रतिष्ठित चोरांशी सेटिंग करणारे अनेक पोलिस आहेत. त्यांचे डील सहसा उघड होत नाही.
राखीव पोलिस दलातील पोलिस विकास कौशिक पकडला गेला. त्याचे सेटिंग स्पष्टपणे उघड झाले. त्यामुळे त्याला परवाच बडतर्फ करण्यात आले. अशी कडक कारवाई झाल्याशिवाय गोवा पोलिसांमधील काही लाचखोर व सेटिंगबाज वठणीवर येणारच नाहीत. कौशिकचे कारनामे पूर्वीच उघड झाले होते. त्याविषयी विधानसभेतही चर्चा झाली होती. पूर्वी त्याची फक्त बदली करण्यात आली होती. आता त्याला कायमचा घरचा रस्ता दाखविण्यात आला. गोवा पोलिस दलाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन संशयाचाच आहे. अनेक प्रामाणिक व कष्टाळू पोलिस व अधिकारी दलात आहेत. मात्र, पोलिस खात्यातील काही जण लाचखोरी व भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले आहेत. हप्तेबाजीची कीड वरपासून खालपर्यंत लागली आहे. याला राजकीय व्यवस्थाही जबाबदार आहे. पोलिस खात्यात भरती करतानाच भ्रष्टाचार सुरू होतो. त्याचे परिणाम पुढे पूर्ण समाजाला भोगावे लागतात.
नोकरीला लागलेला पोलिस वसुली सुरू करतो. एक-दोघे पकडले जातात. लाचखोरीप्रकरणी पूर्वीही अनेक पोलिसांविरुद्ध कारवाई झाली आहे. पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना काही हवालदार, पोलिस उपनिरीक्षक यांच्याविरुद्धदेखील कडक कारवाई झाली आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रिपदी असताना एका आयजीपीविरुद्ध पाच लाख रुपये लाचखोरीचा आरोप हलवाई नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने केला होता. त्या आयपीएस अधिकाऱ्याला गोव्यातून बदनाम होऊनच जावे लागले. गोव्यात येणारे काही आयपीएस अधिकारीदेखील गोव्याकडे मौजमजेचे व लुटीचे ठिकाण म्हणून पाहतात की काय? अशी शंका येते. रात्रीच्यावेळी किनारी भागात होणाऱ्या पायमध्ये काही अधिकारी रमलेले असतात.
डीआयजी डॉ. ए. कोन या अधिकाऱ्यावर क्लबमध्ये युवतीशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला. युवतीने त्याला धडा शिकविल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. सरकारनेही त्याची तक्रार केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली. हा डीआयजी काही दिवसांपूर्वीच सेवेतून निलंबित झाला. डीआयजी स्तरावरील अधिकाऱ्यापासून पोलिस कॉन्स्टेबलपर्यंत अनेक पराक्रमी पोलिस गोव्याच्या पोलिस दलाला मिळाले, हे यावरून कळते. २००८ साली रवी नाईक गृहमंत्री होते तेव्हा तर गोव्याच्या पोलिस खात्यात प्रचंड शिमगाच सुरू होता. ड्रग्जप्रकरणी काही पोलिसांविरुद्ध कारवाई झाली होती. शिवाय एक रॉय देखील त्याच काळात गाजला होता.
निलंबित कॉन्स्टेबल कौशिक अतिधाडसीच निघाला. फैझान सय्यद या चोराशी त्याचे साटेलोटे होते. चोरीच्या वाट्यात पोलिस हिस्सा घेत होता. सय्यदनेच डिचोली पोलिसांना तपासावेळी ही माहिती सांगितली. सय्यद पोलिसांना सापडला नसता तर कदाचित विकास कौशिकचे बिंग फुटले नसते. हा कौशिक स्वतः दक्षिण गोव्यातील पोलिस स्थानकावर काम करायचा. म्हणून दक्षिणेत नको, उत्तर गोव्यात चोऱ्या कर, असा सल्ला तो द्यायचा.
गोव्यात अलीकडे सगळीकडेच चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. तशात चोरट्यांशी डील करणारे पोलिस जर संख्येने जास्त निघाले तर पूर्ण समाजावरच जीव द्यायची पाळी येईल, असे खेदाने नमूद करावे लागेल, विकास कौशिकशी झालेले डील चोरट्याने उघड करताच सगळ्यांना धक्काच बसला. पोलिस काहीही करू शकतात. कुणाशीही सेटिंग करू शकतात, हे नव्याने कळले. मटका व्यावसायिकांशी तर अनेक पोलिसांचे सेटिंग असते. ही गोष्ट कधी लपून राहिलेली नाही. लाचखोरीमुळेच सामान्य माणसाला पोलिस स्थानकावर न्याय मिळत नाही. पोलिस आपले रक्षण करतील, चोरी झालेला आपला सगळा माल ते मिळवून देतील, असे गरिबांना वाटत नाही. किनारी भागात परप्रांतीय वाहनचालकांना व पर्यटकांना लुटण्याची मोहीम सुरू आहे. तालावच्या नावाखाली पैसे उकळले जातात. यापूर्वी आमदार मायकल लोबो याविषयी बोललेच आहेत. मात्र, ही लूट थांबलेली नाही.