पणजी - बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात मल्टी टास्क आरोग्य कर्मचारी म्हणून काम करणारा रंगनाथ भजजी हा गोव्यात कोविडविरोधी लस घेणारा पहिला कर्मचारी ठरला.राज्यात एकूण सात ठिकाणी दिवसभरात सातशेजणांनी कोविडविरोधी लस घेतली. प्रत्येक केंद्रावर शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविडविरोधी लस दिली गेली. यामुळे दिवसभरात सातशे कर्मचाऱ्यांना लस मिळाली. लसीचा काही परिणाम झाला आहे काय हे पाहण्यासाठी लस दिल्यानंतर संबंधितांना अर्धा तास वैद्यकीय निरीक्षणाखालीही ठेवण्यात आले होते.लसीकरणास बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळातून आरंभ झाला. त्यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती होती. रंगनाथ भजजी हे गोमेकॉमध्ये सफाईचेही काम करतात. ते वाडे सुकूर येथील आहेत. राज्यातील पाच सरकारी व दोन खासगी इस्पितळांच्या ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला. देशात कोविडविरोधी मेड ईन इंडिया लस आणल्याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.कोविडची साथ आली होती, तेव्हापासून ज्या कर्मचाऱ्यांनी रुग्ण सेवेत आपले योगदान दिले त्यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. त्यांना प्रथम कोविडची लस दिली जाणार आहे. डीन डॉ शिवानंद बांदेकर यांच्या मते एका गोमेकॉ इस्पितळात कोविडची लस घेण्यासाठी गोमेकोच्या चार हजार कर्मचाऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात दोन हजार डॉक्टर्स व गोमेकोचे विद्यार्थी आहेत. पुढील शनिवारी लसीकरणाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर आठवड्याला चार दिवस लसीकरण केले जाणार आहे.दरम्यान, मडगावच्या केंद्रात डॉ. आयरा आल्मेदा ह्या लस घेणाऱ्या पहिल्या ठरल्या. तसेच म्हापसा येथे कर्मचारी निलेश गडेकर हा कोविडविरोधी लस घेणारा पहिला कर्मचारी ठरला.
गोव्यात सातशे कर्मचाऱ्यांना कोविडविरोधी लस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 6:54 PM